orange gate to marine drive tunnel Tendernama
पुणे

Pune : ट्रॅफिकने हैराण पुणेकरांसाठी गुड न्यूज! शनिवारवाडा ते स्वारगेट भुयारी मार्गाची तयारी सुरू

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) मध्य पुण्यातील वाहतूक कोंडी (Pune City Traffic) कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्त्यावर भुयारी मार्गाचे काम केले जाणार आहे.

सध्या या दोन्ही मार्गांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. जूनअखेर ‘डीपीआर’ सादर केला जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्त्यावरून दररोज सुमारे २० हजारांहून अधिक वाहनांची ये-जा होते. हे दोन्ही रस्ते अत्यंत वर्दळीचे व दाटिवाटीचे आहेत. त्यामुळे या रस्त्यावर उड्डाण पूल बांधणे अथवा रस्त्याची रुंदी वाढविणे शक्य नाही. परिणामी या रस्त्यावर भूमिगत मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात आमदार हेमंत रासने यांनी पुढाकार घेतला. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे भुयारी मार्गाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर मंत्र्यांनी पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला याचा डीपीआर सादर करण्याचा आदेश दिला.

पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी मेट्रोच्या सल्लागाराची मदत घेत ‘डीपीआर’ला सुरुवात केली आहे. जूनअखेर तो पूर्ण होऊन मंत्र्यांना सादर केला जाईल. त्यानंतरच त्या विषयीचा निर्णय होणार आहे.

असा असणार रस्ता

- शनिवारवाडा ते स्वारगेट व सारसबाग ते शनिवारवाडा असे असतील मार्ग

- २२ मीटर अर्थात ७२ फूट जमिनीखालून हा रस्ता तयार केला जाणार

- चारपदरी रस्ता असेल

- या मार्गांवरून दुहेरी वाहतूक शक्य

- भूमिगत असल्याने मेट्रोची मदत घेतली जाणार

- सध्या दोन्ही रस्ते मिळून सुमारे २० हजार दैनंदिन वाहनांची वाहतूक

- भूमिगत रस्ता तयार झाल्यावर वाहतुकीत वाढ

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर शनिवारवाडा ते स्वारगेट व बाजीराव रस्त्यावरील सारसबाग ते शनिवारवाडा भुयारी मार्गाच्या ‘डीपीआर’च्या कामाला सुरुवात झाली आहे. जूनअखेर डीपीआरचे काम पूर्ण होईल. २२ मीटर किंवा त्याहून अधिक खालून हा रस्ता तयार केला जाईल. इमारतींना कोणताही धोका पोहोचणार नाही.

- अतुल चव्हाण, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे