पुणे (Pune) : बांधकाम व्यावसायिकांसाठी आता गौण खनिज वाहतुकीचा परवाना ऑनलाइन मिळणार आहे. (Pune Good News for Construction Professionals)
गैरव्यवहारांना लगाम लागणार
महापालिकेने दिलेल्या बांधकाम परवान्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘महाखनिज’ पोर्टलशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे उत्खननातून निघणाऱ्या खनिजाच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुन्हा अर्ज करण्याची गरज राहणार नाही. तसेच, या प्रणालीमुळे वेळेची बचत होऊन गैरव्यवहारांना लगाम लागणार आहे.
बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम प्रकल्प सुरू करण्यासाठी महापालिकेकडून विविध परवाने दिले जातात. या मंजुरीनंतर बांधकाम व्यावसायिक प्रत्यक्ष जागेवर प्रकल्पाला सुरुवात करतात, त्यासाठी उत्खनन केले जाते. नकाशानुसार करण्यात येणाऱ्या जागेच्या उत्खननातून ठराविक प्रमाणात गौण खनिज निघते.
या गौण खनिजाची वाहतूक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागातून परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी व्यावसायिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करून परवानगी मिळवता येते. मात्र, ही परवानगी देण्यासाठी अनेकदा सहा महिन्यांहून अधिक काळही लागतो. त्यात व्यावसायिकांना चिरीमिरीही द्यावी लागते.
परिणामी, व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे वेळ व आर्थिक तोटा कमी करण्याबाबत आता जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेने पुढाकार घेतला आहे.
पारदर्शकता वाढणार
महापालिकेच्या परवान्यानुसार किती खनिज उत्खनन झाले, त्याची वाहतूक कोणत्या वाहनांमधून होते, याची नोंद ऑनलाइन होणार आहे. परिणामी, प्रत्येक प्रकल्पाची रॉयल्टी योग्यप्रकारे वसूल केली जाणार आहे. नवीन प्रणालीमुळे पारदर्शकता वाढणार असून गैरप्रकार करणाऱ्यांवरही कारवाई होईल, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली
प्रणालीमुळे काय होणार?
- महापालिकेतून दिल्या जाणाऱ्या सर्व बांधकाम व्यावसायिकांचे परवाने पोर्टलवर उपलब्ध होणार
- गौण खनिज वाहतुकीसाठी घेण्यात येणाऱ्या परवानगीबाबतही पारदर्शकता येणार
- प्रत्येक व्यावसायिक परवानगी घेतोय का? यावरही लक्ष ठेवले जाणार
- नकाशानुसार किती गौण खनिज उत्खनन केले, त्याची माहिती उपलब्ध होणार
- अनेकदा बांधकाम व्यावसायिक वाहतुकीची परवानगी न घेताच वाहतूक करतात
- जिल्हा प्रशासनाचे आर्थिक नुकसान टळणार