G20
G20 tendernama
पुणे

G-20 Pune: अर्थवट कामांचे पुढे काय होणार? आयुक्त म्हणतात...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरात झालेल्या G-20 परिषदेसाठी ज्या ८० चौकांचे सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते, त्यापैकी ज्या चौकांचे काम अर्धवट पडून आहे त्यांची पाहणी करून ते पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी दिली.

जी २० परिषदेची पहिली बैठक पुणे शहरात नुकतीच संपन्न झाली आहे. आता पुढील बैठका जुलैमध्ये होणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने महापालिकेने नगर रस्ता, येरवडा, विमाननगर, खराडी, विश्रांतवाडी, मुंढवा, हडपसर, वानवडी, फुरसुंगी, कोंढवा, खडी मशिन, स्वारगेट परिसर, कात्रज, नवले पूल, वडगाव चौक, पौड रस्ता, कर्वे रस्ता, बाणेर, सातारा रस्ता, वारजे, धायरी, महंमदवाडी या भागातील ८० चौकांची सुशोभीकरणासाठी निवड केली होती.

खासगी संस्था आणि बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून हे सुशोभीकरणाचे काम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी चौकांची कामे पूर्ण झाली आहे. तर काही ठिकाणी कामे सुरू आहेत. या चौकांच्या सुशोभीकरणाबरोबर त्याचे पुढील चार-पाच वर्षांची देखभाल दुरुस्ती ही संबंधितांवर देण्यात आली आहेत. त्या मोबदल्यात १८ बाय २४ इंच आकाराचे त्यांना स्वतःचे नाव वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र जी २० ची पहिली बैठक झाल्यानंतर देशील बहुतांश चौकातील कामे अपूर्ण आहेत.

जी २० परिषदेच्या निमित्ताने ८० चौकांचे सुशोभीकरण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. हे काम खासगी बांधकाम व्यावसायिक, संस्थांच्या मदतीने करण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून अनेक चौकांचे काम अर्धवट अवस्थेमध्ये पडून आहे. त्यामुळे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी पाहणी दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान रखडलेली कामांना गती देण्यात येणार आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त पुणे महापालिका