cab service Tendernama
पुणे

Pune : वाहतूक कोंडीने त्रासलेल्या पुणेकरांची पसंती ‘कॅब’ला; शहरातील ‘कॅब’ची संख्या...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : एकीकडे प्रचंड वाहतूक अन दुसरीकडे अपुरे वाहनतळ किंवा वाहन लावण्याच्या अपुऱ्या वैध जागा अशा दुहेरी कोंडीमुळे त्रासलेल्या पुणेकरांनी ‘कॅब’च्या पर्यायाला प्राधान्य दिले आहे. सरत्या वर्षात पुण्यात ‘कॅब’च्या संख्येत नऊ हजारांनी वाढ झाली. शहरातील ‘कॅब’ची एकूण संख्या ५३ हजाराच्या घरात पोचली आहे.

‘कॅब’च्या प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे रिक्षांची संख्या १ लाख ३० हजार झाली असली तरी ‘कॅब’ही वाढत आहेत. स्वतःकडे चारचाकी वाहन असले तरी अनेक जण कोंडी आणि वाहनतळाच्या समस्येला कंटाळून ‘कॅब’ला प्राधान्य देतात. पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचे अन्य पर्याय उपलब्ध असले तरी ‘कॅब’ची संख्या वाढत आहेत. शहरात रोज सुमारे पाच लाख प्रवासी ‘कॅब’च्या माध्यमातून प्रवास करतात. मागील वर्षी ही संख्या सुमारे चार लाख इतकी होती, अशी वाहतूक तज्ज्ञांची माहिती आहे.

पुण्यात सध्या सार्वजनिक वाहतुकीचा वेग ताशी १९ किलोमीटर इतका आहे. शहराच्या विविध भागांत सतत कोंडी होत असल्याने शहरांतर्गत प्रवासासाठी पीएमपीनंतर रिक्षा व ‘कॅब’चा पर्याय निवडला जातो. कोरोनानंतर ‘कॅब’च्या सेवेला मोठा ब्रेक लागला होता. विविध वित्तीय संस्थांनी थकीत कर्जामुळे अनेक ‘कॅब’ताब्यात घेतल्या होत्या. काही चालकांनी ‘कॅब’चा व्यवसाय सोडून दुसरा पर्याय निवडला होता. त्यामुळे पुण्यातील ‘कॅब’चा व्यवसाय अडचणीत आला होता. आता मात्र ‘कॅब’च्या संख्येनी भरारी घेतली आहे.

‘कॅब’ची कारणे

१) वाहतूक कोंडी

२) वाहनतळाचा जटिल प्रश्न

३) इतर प्रकारच्या रोजगाराचा प्रश्न

४) काही रिक्षा चालकांचेही ‘कॅब’ व्यवसायाकडे वळणे

प्रवाशांचे फायदे

१) ‘कॅब’ वाढल्याने प्रवाशांचा प्रतिक्षेचा वेळ कमी

२) कॅबचालकांनी ‘बुकिंग’ नाकारण्याचे प्रमाण घटले

३) कॅब सहजपणे उपलब्ध होतात

४) वाहनांची उपलब्धता वाढल्याने प्रवाशांना निवडीचे जास्त पर्याय

सार्वजनिक वाहतूक आणि प्रवासी :

- पीएमपी बस : १३ लाख

- रिक्षा : ३० लाख

- मेट्रो : दीड लाख

- कॅब : ५ लाख

- लोकल : ३० ते ३५ हजार

(प्रवासी संख्या दैनंदिन आणि अंदाजे)