पुणे (Pune): पुणे शहरातील नदीवरील पूल, रेल्वेपूल, उड्डाणपूल, नाल्यांवरील कलव्हर्ट सुरक्षित आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्थायी समितीने एक कोटी १८ लाख रुपयांच्या टेंडरला (Tender) मान्यता दिली. (Bridges In Pune City)
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे १५ जून रोजी इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर ३२ जण जखमी झाले. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पुलांची सुरक्षितता आणि स्थितीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या घटनेनंतर महापालिकेने पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू केले होते. या ऑडिटच्या अहवालानुसार पुलांच्या दुरुस्तीचे कामही सुरू केले आहे. पण त्याची गती खूप कमी आहे.
पुणे शहरातील ८६ मोठे व १७० लहान पूल आहेत. त्यापैकी केवळ ३८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. तर ३८ पैकी ११ पुलांवर दुरुस्तीचे काम झाले आहे. उर्वरित पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे बाकी आहे.
यासाठी पुणे महापालिकेने टेंडर मागवले होते. त्यात ‘स्ट्रक्टॉनिक कन्सल्टिंग इंजिनिअर्स’ यांनी सादर केलेले एक कोटी १८ लाखांची सर्वांत कमी दराचे टेंडर स्वीकाण्यात आले असून त्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
२०१३-१४ मध्ये पुणे महापालिकेने १८ पुलांचे, तर २०१८-१९ मध्ये १२ पूल आणि उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यानंतर २०२१ मध्ये २० वर्षांहून अधिक जुन्या ३८ पुलांचे ऑडिट करण्यात आले. सध्या शहरात ३२ नदीवरील पूल, २० उड्डाणपूल आणि नऊ रेल्वे उड्डाणपूल असे ६१ प्रमुख पूल आहेत, मात्र त्यापैकी ३८ पुलांचेच ऑडिट झाले असून, उर्वरित पुलांचे ऑडिट बाकी आहे.
महापालिकेने उर्वरित पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी टेंडर प्रक्रिया राबवली होती. त्यात ‘स्ट्रक्टॉनिक कन्सल्टिंग इंजिनिअर्स’ या कंपनीचे एक कोटी १८ लाख रुपयांचे टेंडर सर्वांत कमी दराचे ठरले. स्थायी समितीने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.