Pavna River
Pavna River Tendernama
पुणे

Pune: नागरिकांना वेठीस धरणाऱ्या 'त्या' ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करा!

टेंडरनामा ब्युरो

Pune : पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर येथील पवना नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. गेली दोन वर्षे नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचा काळ्या यादीमध्ये समावेश करण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

महापालिकेच्या ‘बीआरटीएस’ विभागामार्फत पिंपरी गाव ते पिंपळे सौदागरपर्यंत नदीवरील पुलाच्या कामाचे आदेश व्ही. एम. मातेरे इंफ्रा.(इ) प्रा. लि. यांना २२ डिसेंबर २०२२ रोजी १८ महिन्यांसाठी दिले आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मे. ओएस असिस्टीम स्तूप यांचे टेंडर पूर्व व टेंडर पश्चात कामासाठी नेमणूक केली आहे, असे वाघेरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या कामाची मुदत पूर्ण होऊन अनेक महिने झाले असून, अद्यापपर्यंत फक्त ६० टक्के देखील काम पूर्ण झाले नसल्याचे दिसून येत आहे. तरीही ठेकेदारांना वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे, असाही दावा निवेदनात करण्यात आला आहे.

पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी अनेक नागरिकांनी तसेच माझ्यावतीने अनेकवेळा मागणी अथवा निवेदन देण्यात आलेले आहे. परंतु; महापालिका अधिकारी, नागरिकांना वेठीस धरून, ठेकेदारांना पाठीशी घालणार असतील तर या विरोधात आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल.

- संदीप वाघेरे, माजी नगरसेवक, पिंपरी

पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर या पुलाच्या वाढीव कामात नियोजनाचा अभाव असल्यामुळे ठेकेदाराकडून दिरंगाई झाली आहे. संबंधीत ठेकेदाराला नोटीस देऊन दर दिवसाला पाच हजार रुपयांचा दंड लावला आहे. सल्लागारांनी त्यांचे काम वेळेत केलेले आहे.

- प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता, प्रकल्प