Ajit Pawar
Ajit Pawar Tendernama
पुणे

Pune : विद्यापीठ चौकातील कोंडी अन् शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोबाबत अजितदादांची थेट ऍक्शन

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : विद्यापीठ चौकातील बहुमजली उड्डाणपुलासह मेट्रोच्या (Pune Metro) कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेऊन सूचना केल्या.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मार्गावरील वाहतूक कोंडीवर (Traffic) तत्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देतानाच शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या (Shivajinagar - Hinjewadi - Maan Metro) कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीत दिले. यावेळी या प्रकल्पांतर्गत सुरू असलेले पाईलिंग, कास्टिंग आदी कामाचा आणि समस्यांचा त्यांनी आढावा घेतला.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने (PMRDA) उभारण्यात येत असलेल्या या मेट्रोच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा, खासगी जागांबाबत सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम करावे. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिका तसेच वाहतूक पोलिसांनी समन्वयाने वाहतुकीचे नियोजन करावे, असे पवार यांनी सांगितले.

गणेश खिंड रॅम्पसाठी आवश्यक ४५ मीटर रुंद रस्त्याच्या जागेचा ताबा (आरओडब्ल्यू) सर्व कार्यवाही करून १५ सप्टेंबरपर्यंत देण्यात यावा. यासाठी पुणे महानगरपालिकेने आवश्यक कार्यवाही करावी. औंध, बाणेर, पाषाण, गणेश खिंड रॅम्प येथील बॅरिकेडिंग करणे, आवश्यक तिथे वाहतूक वळवणे आदी कामे नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन करावेत, असेही निर्देश दिले आहेत, असे पवार म्हणाले.

प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने उशीर लागता कामा नये. तसेच खासगी जागांबाबतही जागा मालकांशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. भविष्यातील ५० वर्षांचा विचार करून प्रकल्पाच्या आराखड्यात तडजोड होता कामा नये, असे पवार यांनी स्पष्ट केले.