TP Scheme
TP Scheme Tendernama
पुणे

Pune : तब्बल 33 वर्षांनंतर महापालिकेने घेतला निर्णय; 'या' टीपी स्किमसाठी हालचाली सुरू

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेतर्फे (PMC) उरुळी देवाची येथील नगर रचना योजनेचे (टीपी स्कीम TP Scheme) काम सुरू केले असून, त्याठिकाणी ठिकाणी २४ मीटर रुंदीचे २.६८ किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते करण्यासाठी २८ कोटी रुपयांच्या खर्चाला अंदाज समितीच्या बैठकीमध्ये नुकतीच मान्यता देण्यात आली.

महापालिकेने तब्बल ३३ वर्षानंतर उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथे टीपी स्कीम करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने प्रस्तावित केलेल्या टीपी स्कीमला राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर उरुळी देवाची येथील काम सुरू कामासाठी हालचाल सुरू झाली आहे.

उरुळी देवाची येथे ११० हेक्टरवर टीपी स्कीम केली जाणार आहे. त्यामध्ये ४० टक्के क्षेत्र हे विविध सेवांसाठी वापरले जाते. त्यामध्ये रस्त्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या टीपी स्कीममध्ये २४ मीटर रुंदीचे २.६८ किलोमीटर लांबीचे रस्ते केले जाणार आहे. त्यासाठी २८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी साडेसात मीटरचा मुख्य रस्ता असेल, तर चार मीटर उंचीचा दुभाजक असणार आहे. अडीच मीटर रुंदीचे पादचारी मार्ग केले जाणार आहेत. त्याशिवाय सांडपाणी वाहिनी, जलवाहिनी, विद्युत वाहिनी यासह इतर भूमीगत सेवा वाहिन्या टाकण्यासाठी डक्‍टची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्ता खोदावा लागणार नाही.

तसेच या भागात वृक्षारोपण करण्यात येणार असल्याने टीपी स्कीममध्ये हरितक्षेत्र निर्माण केले जाणार आहे. हा प्रस्ताव इस्टिमेट समितीपुढे आल्यानंतर त्यावर अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा करून त्यावर निर्णय घेतला.