Flyover Tendernama
पुणे

PMRDA : 30 कोटींचा 'तो' पूल जोडणार 2 महामार्ग

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्‍यावतीने (पीएमआरडीए-PMRDA) हिंगणगाव (ता. हवेली) येथे मुळा-मुठा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलामुळे परिसरातील गावांसह दोन महामार्ग जोडले जाणार आहेत. त्‍यामुळे वाहतुकीला वेग मिळणार आहे. त्‍यासाठी २९.३८ कोटी रुपयांच्‍या खर्चाला मंजुरी मिळाली आहे.

याबाबत आयुक्त योगेश म्‍हसे यांनी माहिती दिली. ‘पीएमआरडीए’ क्षेत्रातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी प्रशासनाच्‍या वतीने पाऊले उचलली आहेत. विविध प्रकल्‍प, उड्डाणपुलाची निर्मिती ‘पीएमआरडीए’ करत आहेत. त्‍याचाच एक भाग म्‍हणून हवेली तालुक्‍यातील गावे आणि महामार्ग जोडण्यासाठी हिंगणगाव येथे‍ पुलाची निर्मिती करण्याचे प्रशासनाचे प्रयोजन आहे.

‘पीएमआरडीए’च्‍या क्षेत्रामध्ये थेऊर-तारमळा-पेठ-उरुळी कांचन-खामगाव टेक-हिंगणगाव- शिंदेवाडी रस्ता साखळी क्रमांक १७/७०० किलोमीटर हिंगणगाव येथे मुळा-मुठा नदीवर हा पूल बांधण्यात येणार आहे. या बांधकामासाठी २९.३७ कोटी रुपयांच्‍या कामाला मंजुरी मिळाली आहे. २७ सप्‍टेंबर २०२४ पासून १८ महिने कामाची मुदत आहे. सध्या भूसंपादनासाठी जिल्‍हाधिकाऱ्यांकडे प्रस्‍ताव दाखल आहे. मंजुरी मिळताच अधिक प्रक्रिया सुरू होणार आहे.

पुलाचे फायदे

- वाघोली राहू-रस्ता (राज्‍य मार्ग ६८) व उरुळीकांचन व पुणे-सोलापूर रस्ता (राष्ट्रीय महामार्ग ९) यांना जोडणारा मार्ग

- प्रमुख जिल्‍हा मार्ग १३८ वरील हवेली तालुक्यातील शिंदेवाडी, लबडेवस्ती, राऊत वस्ती, सहजपूर वाडी, लोणकरवाडी, पाटील वस्ती, साळुंखे वस्ती गावे जोडली जाणार

- शेतीपूरक व्यवसाय, औद्योगिक क्षेत्राला फायदा

- रोजगार उपलब्ध होणार.

कामाची सद्यस्थिती

- दोन्ही बाजूच्या पोहोच रस्त्याकरीता हिंगणगाव व खामगाव टेक येथील आवश्यक भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी, पुणे यांच्‍याकडे सादर.

- कंत्राटदारामार्फत सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर.

- पुलाच्‍या डिझाइनचे काम प्रगतीपथावर.

असा असेल पूल

२०० मीटर लांब, १२ मीटर (फुटपाथसह) रुंदीचा हा पूल असेल. येथे उच्‍च प्रतीचे आरसीसी/प्रीस्टेस्ड गर्डरसह पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच २५ मीटरचे आठ स्पॅन, सात पिअर आणि नदीच्‍या दोन्ही बाजूस आरसीसी बांधकामाचा समावेश आहे. हिंगणगाव बाजूचा ११० मीटर लांबी व खामगांव टेक बाजूस २३० मीटर लांबी, ५.५० मीटर रुंदीच्या पोहोच रस्त्याचा देखील या कामात समावेश आहे.