पिंपरी (Pimpri): अनेक ठिकाणे थांबेच नाहीत, जेथे आहेत त्यावर छप्पर नाही, बसायला बाक नाहीत, असलेच तर तुटले आहेत, काही ठिकाणी लावलेले बाक गायब झाले आहेत, फलकांचा पत्ता नाही...ही रडकथा आहे पिंपरी-चिंचवडमधील ‘पीएमपीएमएल’च्या बस थांब्यांची.
बस थांब्यापाशी उन्हाळ्यात थांबल्यास झळा, पावसाळ्यात थांबल्यास धारा असे भोग प्रवाशांच्या वाट्याला येतात. कडक ऊन किंवा मुसळधार पाऊस झेलतच त्यांना बसची वाट पाहावी लागते. अशावेळी ‘वाट पाहीन पण पीएमपीएलनेच जाईन’ ही उक्ती पिंपरी-चिंचवडच्या रहिवाशांना पश्चात्ताप करायला लावणारी ठरली आहे. याकडे महापालिका, याकडे महापालिका, ‘पीएमपीएमएल’ प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यापैकी कुणीतरी केव्हा तरी लक्ष देईल अशी वेडी आशा बाळगून हे प्रवासी बस थांब्यावर थांबलेले असतात.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’ अशा तीन हद्दींमध्ये पुणे परिवहन महामंडळाच्या बस धावतात. शहरातील बीआरटीच्या पाच मार्गांवरील ९२ बसथांबे वगळता इतर थांब्यांची अवस्था फारच बिकट आहे. शहरात ‘पीएमपी’चे तेराशेपेक्षा जास्त बसथांबे आहेत. त्यातील जवळपास एक हजारपेक्षा जास्त बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी थांबा नसून केवळ पाट्या राहिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत ‘पीएमपी’ने आमदार, खासदार तसेच नगरसेवकांच्या निधीतून नव्याने लावलेल्या थांब्यांचीही दुरवस्था झालेली आहे.
टेंडरचा नुसताच खेळ
टेंडरमध्ये जवळपास तीन वर्षे गेल्यानंतरही बसथांबे उभारत नसल्याने प्रवाशांना तक्रारी करून हतबल व्हावे लागले आहे. पीएमपीने २०२१ मध्ये १,६०० नवे बसथांबे उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पैसे नसल्याने बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर हे थांबे उभारले जाणार होते. त्यासाठीची पहिली टेंडर जून २०२१ मध्ये काढण्यात आली. त्याला प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे या टेंडरला मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे एवढ्या मोठ्या कामासाठी बोली लागणार नाही असा अंदाज बांधत ६ मे २०२२ मध्ये ६०० बसथांब्यांची एक टेंडर काढण्यात आली. यावेळीदेखील प्रतिसाद न आल्याने २०२३ मध्ये ३०० बसथांब्यांची टेंडर काढण्यात आली होती. यास वांरवार मुदत वाढ दिल्यानंतर अखेर एका संस्थेने कंत्राट घेऊन काम सुरु केले. त्यानंतर अजूनही सर्व १५० थांब्यांचे काम पूर्ण झालेले नाही. पीएमपीने प्रशासनाने गेल्यावर्षी २०० बस थांब्याची टेंडर काढली. याचा करार या आठवड्यात पूर्ण होऊन काम सुरु होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
महापालिका, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
महापालिका आणि पीएमपीने शहरभर कोट्यवधींचा खर्च करत स्टीलचे बस थांबे उभारले. पण, या बसथांब्यांच्या सांगाड्यांचा एक-एक भाग रोज गायब होत आहे. काही ठिकाणी सांगाडेही तोडून विकण्यासाठी पळविण्यात आले आहेत. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. इतर शहरांत आमदार किंवा खासदार निधीतून बस थांबे उभारले जातात. पिंपरी-चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधींकडून मात्र बस थांबे उभारले जात नाहीत असे चित्र आहे. याबाबतीत हे माननीय ‘सन्माननीय’ अपवाद ठरले आहेत.
पीएमपीचा पसारा
प्रतिदिन सरासरी उत्पन्न ः दीड कोटी रुपये +
रस्त्यावरील बस ः सुमारे १६५०
प्रतिदिन सरासरी प्रवासी ः १० लाख +
प्रतिदिन सरासरी किमी प्रवास ः तीन लाख+
बसच्या प्रतिदिन फेऱ्या ः १७ हजार+
एकूण बसथांबे ः ९ हजार +