Pune City
Pune City Tendernama
पुणे

Pune Metro : पिंपरीतून पुण्यात जाणे झाले सोईचे; आता वेध 'या' विस्तारीत मार्गाचे

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक ऑगस्ट रोजी फुगेवाडी ते शिवाजीनगर (पुणे) न्यायालय स्थानकापर्यंतच्या मेट्रो मार्गाचे ऑनलाइन उद्‍घाटन झाले. त्यामुळे पिंपरीतून थेट पुण्यात जाणे व तेथून रूबी हॉल क्लिनिक किंवा वनाजपर्यंत जाणे सोईचे झाले आहे. आता पिंपरीतून निगडीपर्यंतच्या विस्तारित मार्गाला मुहूर्त कधी? याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे. या मार्गामुळे चिंचवड, आकुर्डी, निगडीसह प्राधिकरण, चिखली, तळवडे, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, रावेत भागातील नागरिकांची सोय होणार आहे.

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी हे मार्ग निश्चित झाले. त्यातील वनाज ते रूबी हॉल क्लिनिकपर्यंत मेट्रो धावत आहे. तेथून रामवाडीपर्यंतच्या उन्नत मार्गाचे आणि स्वारगेट ते शिवाजीनगर न्यायालय भूमिगत मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. शिवाजीनगरपासून पिंपरीपर्यंतच्या उन्नत मार्गावर मेट्रोने प्रवासी सेवा सुरू केली आहे. त्यामुळे पिंपरी, मोरवाडी, चिखली, नेहरूनगर, संत तुकारामनगर, मोशी, भोसरी, कासारवाडी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, नवी सांगवी, जुनी सांगवी, फुगेवाडी, दापोडी आदी भागातील नागरिकांची सोय झाली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) मेट्रो स्थानकांशी जोडणारी बससेवा सुरू केली आहे. पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो मार्ग उभारल्यास त्या परिसरातील नागरिकांचीही सोय होणार आहे.

दृष्टिक्षेप...
निगडी ते पिंपरी (पीसीएमसी) ः ४.४१ किलोमीटर (प्रस्तावित)
पिंपरी ते पुणे जिल्हा न्यायालय ः १३.९ किलोमीटर (सेवा सुरू)
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट ः ३.५० किलोमीटर (भुयारी मार्ग प्रगतिपथावर)
(जिल्हा न्यायालय स्थानकावर उतरून उन्नत मार्गाने वनाज-रामवाडी मार्गावरील भागात जाता येईल. या मार्गावर पुण्यातील मंगळवार पेठ, रेल्वेस्थानक, बंडगार्डन, येरवडा, रामवाडी आणि पुणे महापालिका भवन, बालगंधर्व, डेक्कन, गरवारे महाविद्यालय, नळ स्टॉप, कर्वे रस्ता, कोथरूड, आनंदनगर, वनाज आदी भागांचा समावेश आहे.)

पिंपरीपासून शिवाजीनगरपर्यंत जायला मेट्रोची सुविधा झाली आहे. पण, या सेवेचा लाभ घेण्यासाठी चिंचवड, निगडी, आकुर्डी, प्राधिकरण परिसरातील नागरिकांना पिंपरीपर्यंत जावे लागत आहे. या भागातून शिवाजीनगर, कोथरूड, पुणे स्टेशन, स्वारगेट भागात नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यामुळे पिंपरीपासून निगडीपर्यंत मेट्रो सेवा सुरू करायला हवी.
- सूर्यकांत मुथियान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता, निगडी

पिंपरी ते निगडी मेट्रोबाबत केंद्रीय शहरी विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली. राज्य सरकारच्या प्रस्तावास मान्यता देऊ, असे त्यांनी सांगितले आहे. प्रस्तावातील सर्व त्रूटी दूर केल्या आहेत. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी अशी तीन स्थानके असतील. या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन चांगली कनेक्टिव्हिटी वाढेल. प्रवाशांची सोय होईल.
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ

पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहे. त्याला केव्हाही मान्यता मिळू शकते. सध्या स्थितीत सुरू असलेल्या पिंपरी ते शिवाजीनगर आणि वनाज ते रूबी हॉल क्लिनिक मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला सरासरी पन्नास हजार प्रवासी लाभ घेत आहेत. भविष्यात ही संख्या आणखी वाढणार आहे. गर्दीच्या वेळी प्रत्येक दहा मिनिटांना मेट्रो धावत आहे.
- डॉ. हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, जनसंपर्क, मेट्रो