Road Tendernama
पुणे

Pimpri : खड्डे दुरुस्ती आणि रस्ते डांबरीकरणाला अखेर मिळाला मुहूर्त

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : नवीन जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्या टाकण्यासाठी केलेली खोदकामे, लांबलेला पाऊस यामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले होते. पावसामुळे डांबराचे प्रकल्प बंद असल्याने डांबरीकरणाऐवजी तात्पुरती व्यवस्था म्हणून खडी, मुरूम, कॉंक्रिट, पेव्हिंग ब्लॉक, कोल्ड मिक्स वापरून खड्डे बुजविण्यावर महापालिकेने भर दिला होता. मात्र, आता पाऊस थांबला असून खड्डे दुरुस्ती व रस्ते डांबरीकरणाला मुहूर्त लागला आहे.

शहरातून मुंबई-पुणे, मुंबई-बंगळूर (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग), पुणे-नाशिक महामार्ग जातात. त्यांसह शहरांतर्गत छोट्या रस्त्यांवरसुद्धा खड्डे पडले आहेत. यात देहू-आळंदी रस्ता, निगडी-भोसरी टेल्को रस्ता यांसह समाविष्ट गावांतील छोट्या रस्त्यांवर नवीन जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी अद्याप काम सुरू आहे. काही ठिकाणी खासगी व्यक्ती, व्यावसायिकांनी विविध वाहिन्या, केबल्स टाकण्यासाठी रस्त्यांवर आडवे चर खोदले आहेत. खोदकाम केलेल्या ठिकाणी पावसामुळे डांबरीकरण होऊ शकलेले नाही. खड्डे बुजविण्यासाठी खडी, मुरूम, कॉंक्रिट, पेव्हिंग ब्लॉक, कोल्ड मिक्सचा वापर महापालिकेने केला आहे. मात्र, पाऊस आणि रहदारीमुळे खोदकाम केलेल्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडले होते. ते आता डांबरीकरणाने बुजविण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. काही भागातील रस्त्यांबाबत टेंडर प्रक्रिया राबविली आहे.

‘स्वयंचलित’चा आधार

खड्डेमुक्त शहरासाठी महापालिका स्वयंचलित तंत्रज्ञानाद्वारे रस्त्यांचे सर्वेक्षण करणार आहे. त्याअंतर्गत खड्डे व पदपथांची स्थिती समजण्यासाठी प्रत्येक रस्त्याचे दहा मीटर अंतराचे छायाचित्र घेतले जाणार आहे. रस्त्यांचे मूल्यांकन करून गुणवत्ता तपासली जाणार आहे. खड्ड्यांना कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार असल्याचे आयुक्तांनी यापूर्वी जाहीर केले आहे.

डांबरीकरणाचे कामे

जलवाहिन्या टाकून झाल्यानंतर रस्त्यांवर पडलेले चर बुजवून डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेने टेंडर प्रक्रिया राबवली आहे. यात प्रभाग २० आणि प्रभाग ३० मधील रस्त्यांचा समावेश आहे. दोन्ही ठिकाणच्या कामांसाठी प्रत्येकी एक कोटी ५४ लाख ९३ हजार ७६८ रुपये अर्थात तीन कोटी नऊ लाख ८७ हजार ५३६ रुपये खर्च अपेक्षित आहे. काम पूर्ण करण्यासाठी बारा महिन्यांची मुदत आहे.

‘‘कोल्डमिक्स, पेव्हिंग ब्लॉक, खडी-मुरूम, कॉंक्रिटचा वापर करून पावसाळ्यात खड्डे दुरुस्ती केली जात होती. आता पाऊस थांबल्याने डांबरीकरण केले जाणार आहे.’’

- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका