Pimpri Chinchwad Municipal Corporation
Tendernama
पिंपरी (Pimpri) : महापालिकेच्या विविध ठिकाणच्या मिळकतींच्या सुरक्षेसाठी १७५ वॉर्डन व एक हजार ४६५ रखवालदारांची ठेकेदारामार्फत एका वर्षांसाठी नियुक्ती केली होती. टेंडर न काढता त्याच ठेकेदारांकडून वाढीव एका वर्षांसाठी थेट पद्धतीने कर्मचारी घेण्याचा निर्णय सुरक्षा विभागाने घेतला आहे. एका वर्षांसाठी तब्बल ४६ कोटी ६२ लाख ५८ हजार ५६० रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय, विभागीय कर संकलन कार्यालय, गोदाम, शाळा, स्टेडिमय, क्रीडांगण, जल शुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, उद्यान, रूग्णालय, दवाखाने, नाट्यगृह, सांस्कृतिक केंद्र, प्रकल्प व इतर इमारती शहरभरात आहेत. या मिळकतींच्या सुरक्षेसाठी पालिकेने एकूण १ हजार ४६५ रखवालदार ठेकेदारांमार्फत नेमले आहेत. रखवालदार पुरविण्याचा करार १६ मार्च २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ असा एक वर्षाचा आहे. त्यापुढील कालावधीसाठी टेंडर प्रक्रिया न राबविता त्याच ठेकेदारांना थेट एका वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सुरक्षा विभागाने घेतला आहे.
नवीन किमान वेतन दरानुसार अकुशल कामगारांचे मूळ वेतन ११हजार ५००, महागाई भत्ता ६ हजार १६० व इतर असे एकूण २३ हजार ६९२ महिन्याचे एकत्रित वेतन रखवालदारांना दिले जाते. सर्व रखवालदारांचे एका महिन्याचे एकूण वेतन ३ कोटी ४७ लाख ८ हजार ७८० होते. तर, एका वर्षांचे एकूण वेतन ४१ कोटी ६५ लाख ५ हजार ३६० खर्च आहे.
तसेच, वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी महापालिकेने १७५ ट्रॅफिक वार्डन नियुक्त केले आहेत. त्याच्या कामाची मुदत १६ मार्च २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ अशी एका वर्षाची आहे. त्यानंतरच्या कालावधीसाठी निविदा न काढता, आहे त्या ठेकेदारांना एका वर्षांची थेट मुदतवाढ देण्याचा निर्णय सुरक्षा विभागाने घेतला आहे. वार्डन यांनाही नवीन किमान वेतन दराने एकूण २३ हजार ६९२ रुपये वेतन पालिका अदा करते. सर्व वार्डनचा एका महिन्याचे एकूण वेतन ४१ लाख ४६ हजार १०० असून, एका वर्षाचे एकूण वेतन ४ कोटी ९७ लाख ५३ हजार २०० आहे. रखवालदार व ट्रॅफिक वार्डन असे एकूण १ हजार ६४० जणांचे एका वर्षांचे एकूण वेतन ४६ कोटी ६२ लाख ५८ हजार ५६० इतके आहे. टेंडर न काढता थेट पद्धतीने खर्चास मंजुरी दिली आहे.