PCMC Tendernama
पुणे

Pimpri : भोसरी, दिघीकरांची खड्ड्यांपासून होणार कायमची सुटका; सिमेंट रस्त्यासाठी टेंडर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : भोसरीतील दिघी रस्त्याचे होणार सिमेंट कॉंक्रिटीकरण आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांपासून भोसरी, दिघीकरांची कायमची सुटका होणार आहे. वाहतूक कोंडीपासूनही दिलासा मिळणार आहे. टेंडर प्रक्रिया सुरू असून, येत्या दोन महिन्यांत या कामाला सुरूवात होणार आहे.

भोसरीतील प्रभाग क्रमांक सातमधील जवळपास सर्वच मुख्य रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण झाले आहे. तर प्रभाक क्रमांक पाचमधील कै. सखूबाई गवळी उद्यानाजवळून दिघी रस्त्याकडे येणाऱ्या रस्त्याचे या अगोदर सिमेंट कॉंक्रिटीकरण झाले आहे. याच प्रभागातील दिघी रस्त्याचेही आता सिमेंट कॉंक्रिटीकरण होणार असल्याने दिघी रस्त्यावरील नेहमीच्याच खाचखळग्यातून वाहन चालकांची सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भोसरीतील दिघी रस्ता हा दिघीला जोडणारा सर्वात जवळचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यातच रस्त्यावरील विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहनांची कोंडी या रस्त्याला नित्याचीच झाली आहे. रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण झाल्यानंतर या रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्यांवर आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतूनही वाहन चालकांची सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भोसरी, दिघीकरांद्वारे या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरण होण्याच्या कामामुळे आनंद व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाबरोबरच रस्त्यावरील सांडपाणी वाहिनी, विद्युत केबल, जलवाहिन्या नव्याने टाकण्यात येणार आहेत.

असा असेल रस्ता

रस्ता : भोसरीतील संविधान चौक ते गंगोत्री पार्कपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण

लांबी : दीड किलोमीटर

एकूण रुंदी : १८ मीटर

सिमेंट कॉंक्रिट रस्ता : ९ मीटर (४.५मीटरच्या दोन लेन)

रस्त्याच्या दुतर्फा पदपथ : २ मीटर

पार्किंग दुतर्फा : २.५ मीटर

एकूण खर्च : १९ कोटी रुपये

दिघी रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरण कामाचे टेंडर या अगोदरच प्रसिद्ध झाले आहे. सध्या रस्त्याच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या दोन महिन्यांत या रस्त्याच्या कामाला सुरूवात होईल.

- बालाजी पांचाळ, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य विभाग, ई क्षेत्रीय कार्यालय