पिंपरी (Pimpri) : महापालिकेच्या शाळांमध्ये टेबल, खुर्ची, बाक यांसह अन्य फर्निचर साहित्य खरेदीसाठी भांडार विभागाने चार महिन्यांपूर्वी टेंडर (Tender) प्रक्रिया राबविली होती. त्यात पाच ठेकेदारांनी (Contractors) सहभाग नोंदवला. मात्र, फेरटेंडर प्रक्रिया राबविल्यानंतर नऊ टेंडरधारकांनी नमुने सादर केले आहेत.
महापालिका शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बाकांची मागणी भांडार विभागाकडे केली होती. त्यानुसार भांडार विभागाने २७ सप्टेंबर ते नऊ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत टेंडर प्रक्रिया राबविली.
मात्र, तिला प्रतिसाद मिळत नसल्याचे दाखवून पुन्हा टेंडर प्रक्रिया राबवून त्यांच्याकडे उपलब्ध प्रमाणपत्र, कागदपत्र, शॉप ॲक्ट असावे, अशा अटी टाकल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. नवीन प्रक्रियेत नऊ टेंडर धारकांना सहभाग घेतला आहे.
अशा टाकल्या अटी-शर्ती
- सात वर्षे कामाचा अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य
- ओइएम अधिकृत पुनर्विक्रेता अनिवार्य
- बीआयएफएमए स्तर तीन प्रमाणपत्र अनिवार्य
- एनएबीसीबी संस्थेने प्रमाणित केलेले आयएसओ प्रमाणपत्र
- ग्रीनगॉर्ड कम्प्लेन्स सर्टिफिकेट
- सीआयआय प्रमाणित ग्रीन सीओ प्रमाणपत्र
पूर्वीच्या टेंडर प्रक्रियेत पाच जणांपैकी एकच ठेकेदार अटी-शर्तीला पात्र ठरला होता. स्पर्धा होत नसल्याने पुन्हा फेरटेंडर मागविली. दिल्ली स्कूल बोर्डाप्रमाणे अटी-शर्ती मागवल्या आहेत. नऊ ठेकेदारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. तांत्रिक बाबी तपासल्या जातील. सात वर्षांच्या अनुभवाची मागणी केलेली आहे.
- नीलेश भदाणे, उपायुक्त, भांडार विभाग, महापालिका