Tender Tendernama
पुणे

PCMC : टक्केवारीच्या गणितासाठी विद्यार्थ्यांच्या नावावर कोण पोसतेय ठेकेदार?

Tender Scam : यंदाचे शैक्षणिक वर्ष संपत असताना एक लाख पुस्तके छपाई कशासाठी ? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : महापालिका शाळेतील अप्रगत विद्यार्थ्यांना मराठी आणि गणित या विषयात ‘सक्षम’ करण्यासाठी एक लाख पुस्तकांच्या छपाई करिता टेंडर (Tender) काढण्यात आले आहे. दुसरीकडे मात्र शैक्षणिक वर्ष संपण्याच्‍या मार्गावर असताना लाखो रुपयांची उधळपट्टी कशाला? विद्यार्थी ‘सक्षम’ कधी होणार? ही पुस्तके वेळेत वाटप होईल का? खरेदी नेमकी कोणासाठी? असे प्रश्‍न नागरिकांना पडले आहेत.

महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सक्षम मराठी आणि गणित या विषयांची तीन भागांतील एक लाख पुस्तके खरेदी करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या मागणीनुसार मध्यवर्ती भांडार विभागाकडून याबाबतची टेंडर काढण्यात आली आहे. अंदाजे ८५ लाख रुपयांची ही टेंडर आहे. ही टेंडर प्रक्रिया सुरू असून, ती त्यानंतर ३० दिवसांत पुस्तकांच्या छपाईसाठी मुदत देण्यात आली.

टक्केवारीचे गणित?

सध्या जानेवारी महिना सुरू आहे. एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा असते. यंदाचे शैक्षणिक वर्ष संपत असताना एक लाख पुस्तके छपाई कशासाठी ? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. महापालिका शाळेत एक लाख पुस्तकांच्या छपाई करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली आहे. सध्या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असक्षम आहेत का? शिकविण्याच्‍या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

दुसरीकडे टक्केवारीच्या गणितासाठी विद्यार्थ्यांच्या नावावर ठेकेदार पोसण्याचे काम शिक्षण विभाग आणि भांडार विभाग करत असल्याचे दिसून येत आहे. मराठी आणि गणित तीनही भाग मिळून एवढी छपाई केली जाणार आहे.

विषय - पुस्तकांची संख्या

- मराठी भाग १, २, ३ ची एकूण - ५१,२१०

- गणिताची (मराठी व उर्दू माध्यम) भाग १ ,२ ,३ अशी एकूण - ५९,७५७

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये लिहिता वाचता न येणाऱ्या मुलांची चार विभागांत विभागणी करण्यात आली. तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा सक्षम उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पुस्तक खरेदी करण्यात येत आहे.

- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग