PCMC
PCMC Tendernama
पुणे

PCMC: पुणे-मुंबई महामार्गासह 4 रस्त्यांबाबत पालिकेचा मोठा निर्णय

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे-मुंबई महामार्गासह (Pune - Mumbai Highway) शहरातील अंतर्गत मोठ्या चार रस्त्यांच्या सुशोभिकरणाचा निर्णय महापालिका (PCMC) प्रशासनाने घेतला आहे.

हे रस्ते अद्ययावत पद्धतीने दोन्ही बाजूस विकसित केले जाणार आहेत. त्यासाठी नागरिकांच्या सूचनाही विचारात घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार रस्त्यांचे डिझाईन केले जाणार आहे. सुमारे साडेचारशे सूचना महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत.
शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. पर्यायाने सकाळी व सायंकाळी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. भविष्यात त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. त्यावर आताच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने महापालिकेने नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे-मुंबई महामार्गाचे दापोडी ते निगडी दोन्ही बाजूचे रस्ते वाहतुकीसाठी नियोजनबद्धपणे विकसित केले जाणार आहेत.

दापोडी-निगडी नियोजन
दापोडी ते निगडी सलग पादचारी मार्ग व सलग सायकल मार्ग या संकल्पनेच्या आधारे रस्ता विकसित करण्याचे नियोजन आहे. यात सेवारस्ता व आतील द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी सुरळित करणे, त्यावर सुरक्षित प्रवेश करणे, त्यावरून शहराच्या अंतर्गत भागात जाण्यासाठी सुरक्षितपणे बाहेर पडणे या अनुषंगाने मार्गात सुधारणा करण्याचा समावेश आहे. त्यासाठी सेवा रस्त्यावरून मुख्य मार्गावर जाणे व मुख्य मार्गावरून सेवा रस्त्यावर येण्यासाठीचे प्रस्तावित नियोजन तयार केले आहे.

विकासासाठी प्रस्तावित रस्ते
- पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी भक्ती-शक्ती
- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन ते गोविंद गार्डन
- थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक रस्ता
- डांगे चौकापासून वाकड येथील हिंजवडीच्या हद्दीपर्यंत
- निगडी-भोसरी टेल्को रस्त्यावर गवळी माथा ते सेंच्युरी एन्का चौक

चिंचवड ते हिंजवडी रस्ता विकसित करणे, त्यावरील वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. सध्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अवजड वाहने, ट्रक, ट्रेलर यांच्यासाठी एक स्वतंत्र वेळ ठरवून द्यायला हवी. दुभाजकांमधील पंचिंग पॉंईंट बंद करायला हव्यात. आयटी कर्मचाऱ्यांची वाहने सुटतात, त्यावेळी वाहतूनक निंयत्रण गरजेचे आहे.
- सागर भूमकर, भूमकर वस्ती, वाकड

भोसरी-निगडी टेल्को रस्त्याच्या दोन्ही बाजूला एमआयडीसी आहे. त्यातील कंपन्यांत काम करणारे कामगार रिक्षा, टेम्पोने येतात. त्यामुळे त्यांची धावपळ होते. स्वतंत्र सायकल ट्रॅक झाल्यास कामगारांना सायकलने वेळेवर येता येईल. रस्त्याच्या कडेला सावली देणारी झाडे लावावीत. महिला कामगारांसाठी सुरक्षा व वाहतूक व्यवस्था पुरवायला हवी.
- संजय लेंडवे, लघुउद्योजक, एमआयडीसी, भोसरी

पादचारी मार्ग, सायकल मार्ग, सेवा रस्ता व इतर जागा तयार करणे, या संकल्पनेच्या आधारे शहारातील रस्ते विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. सुमारे साडेचारशे सूचना आल्या असून, त्यांचे वर्गिकरण व विश्लेषण केले जाणार आहे. त्यानंतर टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता, महापालिका