Stamp Duty
Stamp Duty Tendernama
पुणे

मुद्रांक शुल्कावरील दंडात आता ५० टक्के सवलत; पण मुदत फक्त...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुद्रांक शुल्क (Stamp Duty) कमी भरल्याने त्यावर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेवर नव्वद टक्के सवलत देण्यासाठीची मुदत रविवारी संपुष्टात आली. या योजनेतंर्गत आता दंडाच्या रकमेवर पन्नास टक्केच सवलत मिळणार आहे. ही सवलत देखील ३० नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे.

जर १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत फरकाची रक्कम भरल्यास दंडावर ५० टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या मुदतीमध्ये अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागाने केले आहे.

जागा,सदनिकासह विविध प्रकाराच्या खरेदी-व्रिकीचे व्यवहाराचे दस्त करताना मुद्रांक शुल्क आकारले जाते. अनेकदा मोठ्या व्यवहारांमध्ये नियमानुसार शुल्क आकारणी होताना कमी शुल्काची आकारणी केली जाते. दुय्यम निबंधक यांना मुल्याकंनाचे अधिकार नाहीत. परंतु अनेकदा त्यांच्याकडून ते निश्‍चित करून दिले जाते. तपासणीत हे लक्षात आल्यानंतर संबंधित नागरीकांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून कमी भरलेले शुल्क आकारले जाते. त्यासाठी काही मुदत दिली जाते. त्या मुदतीत भरले नाही, तर दरमहिना दोन टक्के या दराने दंडाची आकारणी केली जाते. अशा अनेक प्रकरणांमध्ये मुद्रांक शुल्काची रक्कम कमी आणि दंडाची रक्कम भरमसाट होते. त्यामुळे नागरिक ती भरण्यास तयार होत नाही.

या पार्श्‍वभूमीवर ही सवलत योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत ३१ जुलैपर्यंत सहभाग घेतल्यास दंडाच्या रकमेवर नव्वद टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली होती. सोमवारपासून दंडाच्या रकमेत पन्नास टक्केच सवलत मिळणार असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी सांगितले.