Devendra Fadnavis, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Eknath Shinde Tendernama
पुणे

Mumbai: पुणे, सातारा, सोलापूरसाठी राज्य सरकारची गुड न्यूज

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नीरा देवघर पाटबंधारे प्रकल्पासाठी (Nira - Devghar Project) तीन हजार ९७६ कोटी ८३ लाख रुपयांच्या सुधारित प्रकल्प मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतील सुमारे ४३ हजार ५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत उर्वरित महाराष्ट्रासाठी नीरा देवघर हा प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पाद्वारे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ६ हजार ६७० हेक्टर, सातारा जिल्ह्यातील अवर्षणप्रवण खंडाळा तालुक्यातील ११ हजार ८६० हेक्टर, फलटण तालुक्यातील १३ हजार ५५० हेक्टर तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील १० हजार ९७० हेक्टर असे एकूण ४३ हजार ५० हेक्टर क्षेत्र प्रवाही व उपसा सिंचनाखाली येणार आहे.

या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे देवघर येथे कृष्णा खोऱ्यातील भीमा उप खोऱ्यातील नीरा या नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले आहे. वर्ष २००८ पासून धरणामध्ये पूर्णक्षमतेने ३३७.३९ दलघमी इतका पाणीसाठा होत आहे.

या प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासाठी नीरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास नियोजन व वित्त विभागाने सहमती देऊन सदर प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला.