Uday Samant
Uday Samant Tendernama
पुणे

खेड-शिरुरमधील सेझच्या ४ हजार एकर जमिनीबाबत मोठा निर्णय

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : खेड (Khed) आणि शिरूर (Shirur) तालुक्यातील चार गावांतील सेझच्या दुसर्‍या टप्प्यातील सुमारे चार हजार एकर जमिनीवरील भूसंपादनाचे शिक्के येत्या 21 दिवसांत काढण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी येथे बैठकीत दिले.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पुढाकाराने खेड तालुक्यातील पूर, वरुड, वाफगाव व शिरूर तालुक्यातील पाबळ या सेझबाधित गावातील शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाची बैठक उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत आयोजित करण्यात आली होती.

या वेळी येत्या 21 दिवसांत सेझबाधित जमिनीवरील शिक्के काढून शेतकर्‍यांना दिलासा दिला जाईल, असे सामंत यांनी सांगितले. सेझच्या पहिल्या टप्प्यामध्ये कनेरसर, निमगाव दावडी, गोसासी या चार गावांतील सुमारे पाच हजार एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. या ठिकाणी कंपन्या उभ्या राहिल्या. यानंतरची केआईपीएल या कंपनीने सेझच्या दुसर्‍या टप्प्यातील जमीन घेण्यासाठी नकार दर्शविला. सुमारे 15 वर्षांपासून या चार गावातील शेतकरी जमिनीवरील शिक्के काढण्याची मागणी सातत्याने राज्य शासनाकडे करीत होते. बक्षी समितीने देखील याबाबत सकारात्मक अहवाल दिला होता. परंतु, अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. उद्योगमंत्री सामंत यांनी शेतकर्‍यांना दिलासा देत सेझचे शिक्के काढण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकर्‍यांचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यश आल्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले.