Medical Garbage
Medical Garbage Tendernama
पुणे

पुण्यात जैववैद्यकीय कचरा विघटन प्रकल्प लवकरच कार्यान्वित

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्यात निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्यावर येथेच प्रक्रिया करता यावी यासाठी पुणे महानगरपालिका आणि पास्को एन्वॉर्यन्मेंटल सोल्यूशन कंपनी यांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या कचरा विघटन प्रकल्प लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. प्रकल्पातील मशिन्सच्या कार्य क्षमतेची चाचणी पूर्ण होताच हे प्रकल्प पुढील महिन्यापासून कार्यान्वित होऊ शकते असे, पास्कोचे संचालक सुनील दंडवते यांनी सांगितले.

या प्रकल्पात असलेल्या इनसिनिरेशन आणि ऑटोक्लेव्ह मशिनच्या प्रायोगिक तत्त्वावर चाचण्या सुरू आहेत. त्यासाठी ५०० ते १००० किलोग्रॅम इतक्या जैव वैद्यकीय कचऱ्यावरील प्रक्रिया केली जात आहे. या प्रकल्पाची विघटन क्षमता पाहता दररोज सुमारे २० टन जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. पुढील दहा वर्षांची गरज लक्षात घेता, पुणे शहर व परिसरातून मोठ्या प्रमाणात रुग्णालयांमधून निर्माण होणारा कचऱ्यावर आता शहरातच प्रक्रिया केली जाणार आहे.

अशी आहे स्थिती
- साधारणपणे पुणे शहरात वर्षभरात तीन हजारांपेक्षा जास्त जैव वैद्यकीय कचरा संकलित
- यामध्ये शहरातील सुमारे ९५० रुग्णालयांचा समावेश
- सध्या निर्माण झालेल्या जैव वैद्यकीय कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी कचरा मुंबई येथील प्रकल्पात पाठविण्यात येतो
- यासाठी होणारा खर्चाचा ताण, मनुष्यबळ, वेळ आणि विघटन प्रक्रियेची समस्या सोडविण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा
- पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील कैलास स्मशानभूमीच्या आवारात प्रकल्पाची उभारणी

प्रकल्‍पाचे संपूर्ण काम झाले असून आवश्‍यक त्या सर्व मशिन येथे बसविण्यात आल्या आहेत. सध्या या सर्व मशिनची प्रायोगिक तत्त्वावर कार्य क्षमतेची चाचणी सुरू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) ‘कन्सेंट टू ऑपरेट’साठी निवेदन करण्यात आले आहे. ‘एमपीसीबी’मार्फत लवकरच प्रकल्पाची पाहणी केली जाणार असून प्रकल्प ‘एमपीसीबी’च्या सर्व अटींचे व नियमांचे पालन करत आहे याची खात्री केली जाईल. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण होताच शहरातील जैव वैद्यकीय कचऱ्यावरील विघटन प्रक्रियेचे काम पूर्ण क्षमतेने या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाईल. जुलै अखेरपर्यंत या प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- सुनील दंडवते, संचालक, पास्को कंपनी