Ring Road
Ring Road Tendernama
पुणे

पुणे, पिंपरीची कोंडी सोडविणाऱ्या रिंगरोडसाठी 'एवढ्या' कंपन्यांनी भरले टेंडर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोड प्रकल्पासाठी १९ बड्या कंपन्यांनी टेंडर भरले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर रिंगरोडच्या कामाला सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे.

रिंगरोड प्रकल्प राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, त्याला विशेष राज्य महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. पूर्व व पश्‍चिम रिंगरोडची एकूण लांबी १२२ किमी असून, रुंदी सुमारे ११० मीटर इतकी असणार आहे. यात पूर्व रिंगरोड हा ७१.३५ किमी लांबीचा, तर पश्चिम रिंगरोड हा ६५.४५ किमी लांबीचा आहे. पश्चिम भागातील रिंगरोडसाठीचे भूसंपादन जवळपास ७० टक्के झाले आहे. या मार्गाचे काम लवकर सुरू करण्यासाठी पाच टप्पे अर्थात पाच पॅकेज करण्यात आले आहेत. आठ बोगदे, तीन छोटे पूल, दोन मोठे पूल आणि खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरवरून अर्धा किलोमीटर लांबीचा मोठा पूल अशी कामे होणार आहेत. एकाच वेळी पाच टप्प्यांतील रिंगरोडचे काम सुरू करण्याचा मानस ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

असा जाणार रिंगरोड
- पश्चिम रिंगरोड भोर, हवेली, मुळशी, मावळ तालुक्यांतून
- पूर्व रिंगरोड मावळ, खेड, हवेली, पुरंदर, भोर तालुक्यांतून

या मार्गीकेचे भूसंपादन गतीने सुरू आहे. दोन्ही टप्प्यांतील मिळून रिंगरोडचे आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक भूसंपादन झाले आहे. रिंगरोडसाठी ‘एमएसआरडीसी’ने यापूर्वीच ठेकेदार कंपन्यांची पात्रता तपासण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली होती. आता प्रत्यक्ष काम देण्यासाठी ठेकेदार कंपनी नेमण्यासाठीची निविदा प्रक्रिया महामंडळाकडून राबविण्यात आली. १७ जानेवारी ते १ मार्चपर्यंत निविदा भरण्याची मुदत ठेकेदार कंपन्यांना देण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत १९ बड्या कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. निविदा भरण्यासाठी २६ मार्चपर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. त्या मुदतीत आणखी काही कंपन्या निविदा भरण्याची शक्यता असल्याचे महामंडळातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे या निवडणुकीनंतरच ठेकेदार कंपनीची निवड करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असेही महामंडळाकडून सांगण्यात आले.

पश्चिम रिंगरोड टप्पे (आकडे कि.मी.मध्ये)
पहिला - १४
दुसरा - २०
तिसरा - १४
चौथा -७.५०
पाचवा -९.३०

पूर्व रिंगरोड टप्पे
पहिला - ११.८५
दुसरा - १३.८0
तिसरा - २१.२०
चौथा -२४.५०

पूर्व आणि पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या कामासाठी ठेकेदारांकडून टेंडर मागविण्यात आले आहेत. आतापर्यंत १९ ठेकेदार कंपन्यांनी टेंडर भरले आहेत. लवकरच टेंडर उघडून काम दिले जाईल.
- राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी