कात्रज (Katraj) : कात्रज - कोंढवा रस्त्याच्या (Katraj Kondhwa Road) कामाला गती देण्यासाठी कडक भूमिका घेणार असल्याचे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले.
भूसंपादन करण्यासाठी किती जागा आवश्यक आहे आणि किती जागा ताब्यात आली आहे, याचा आढावा घेत कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे आयुक्तांनी शुक्रवारी (ता. २७) अधिकाऱ्यांसह रस्त्याच्या कामाची पाहणी केली. आमदार योगेश टिळेकर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, प्रदीप चंद्रन, माजी नगरसेवक प्रकाश कदम, सहाय्यक आयुक्त राजेश कादबाने, पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, उपअभियंता धनंजय गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
भूसंपादनाला गती देणार
यावेळी पथविभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे जागांबाबतचा आढावा सादर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठका चालू असून जिल्हाधिकारी याबाबत सकारात्मक आहेत. भूसंपादनाच्या कामासाठी गती देऊन लवकर काम करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. कोंढवा आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर आणि राहुलकुमार खिलारे यांच्याकडून वाहतूक समस्या जाणून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या आणि विद्युतवाहिन्या हलविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
निधीसाठी पाठपुरावा करू : आमदार टिळेकर
महापालिकेने कात्रज - कोंढवा रस्त्याच्या कामाला गती द्यावी. तातडीने भूसंपादन करावे. जागा ताब्यात आलेल्या ठिकाणी काम करून घ्यावे. भूसंपादनासाठी १४० कोटी रुपयांचा निधी शासनाकडून आणला आहे. आणखी निधीसाठी पाठपुरावा करणार असून, याबाबत शासनही सकारात्मक असल्याचे आमदार टिळेकर यांनी सांगितले.
शिवसेनेची निदर्शने
आयुक्त येणार असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कात्रज चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी कात्रज चौकातील संजय गुगळे यांची ३९ गुंठे जागा महापालिकेने ताब्यात घेऊन मोबदला म्हणून २१ कोटी रुपये दिले. मात्र, प्रत्यक्षात जागेवर ३९ गुंठे क्षेत्र भरत नसून ५० वर्षांपूर्वी ताब्यात आलेल्या पंपिंग स्टेशन व राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या जागेचे पैसे दिले का? असा प्रश्न उपस्थित करत या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना नेते वसंत मोरे यांनी केली. स्टंटबाजी बंद करा, देखावा बंद करा, कात्रज - कोंढवा रस्ता पूर्ण करा, अशा आशयाचे फलक यावेळी दर्शविण्यात आले.