Pune Cantonment Tendernama
पुणे

पुणे कॅन्टोन्मेंटचा महापालिकेत समावेश; सरकारने का घेतला निर्णय?

Pune Cantonment Board: पुण्यासह 'त्या' 6 कॅन्टोन्मेंट बोर्डांचे महापालिकांत होणार विलिनीकरण; सरकारने का घेतला निर्णय?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Cantonment Board): पुणे, खडकी कटकमंडळ पुणे महापालिकेमध्ये, औरंगाबाद कटकमंडळ छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये देवळाली व अहमदनगर कटकमंडळ स्वतंत्र नगरपालिकामध्ये, कामठी कटकमंडळ येरखेडा नगरपंचायतमध्ये समाविष्ट होणार आहेत. या कटकमंडळाचा (Cantonment Board) महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थात समावेश झाल्याने त्या भागात नागरीसुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

विधानभवन येथे राज्यातील कटक मंडळांचे नगरपालिका, महापालिका क्षेत्रात विलिनीकरणाबाबतच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, गेली अनेक वर्षे कटकमंडळ परिसरातील विकास कामांसाठी स्थानिक ठिकाणांहून मागणी होत असल्यामुळे केंद्र शासनाने नागरी भाग शेजारच्या महापालिका, नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजीनगर, कामठी, अहिल्यानगर, देहू रोड येथे छावणी क्षेत्र आहे. प्रत्येक छावणीसाठी स्वतंत्र परिस्थिती लक्षात घेवून काही ठिकाणी थेट महापालिकेत समावेश करणे व काही ठिकाणी नवीन नगरपालिका स्थापन करावी लागणार आहे.

या कटकमंडळातील कर, वीज, पाणी आर्थिक प्रकरणे, कर्मचारी यांचे हस्तांतरण ही सर्व केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करण्यात यावे. या कटकमंडळाचा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थात समावेश झाल्याने नागरीसुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जिल्हा नियोजनमधून निधी देणार - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे, खडकी, देवळाली, औरंगाबाद, कामठी, अहमदनगर या कटकमंडळांचा संबंधित महापालिका आणि नगरपंचायतींमध्ये समावेश झाल्याने जिल्हा नियोजन समितीमधून या परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडून मदत करण्यात येईल. संबधित समाविष्ट नगरपालिका आणि महानगरपालिकांनी त्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषद सदस्य सिद्धार्थ शिरोळे, सरोज अहिरे, संग्राम जगताप, सुनिल कांबळे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, व्हीसीद्वारे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव, जिल्हाधिकारी पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीगर, अहिल्यानगर, पुणे दक्षिण कमांडचे संचालक, संबंधित महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक संबंधित नगर परिषदांचे मुख्याधिकारी, पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजीनगर, कामठी, अहमदनगर, देहू रोड कटक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.