Mumbai Pune Express
Mumbai Pune Express Tendernama
पुणे

सावधान, एक्स्प्रेस-वेवर वाहन थांबवू नका, भरावा लागेल मोठा दंड

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : द्रुतगती मार्गावर (Mumbai - Pune Expressway) विनाकारण वाहन थांबविणे आता चालकांना महागात पडणार आहे. कारण, अशा वाहनांवर आरटीओचे पथक थेट दंडात्मक कारवाई करणार आहे. आपले वाहन जर बंद पडले असेल तर त्यासाठी महामार्ग पोलिसांकडे मदत मागितल्याचा पुरावा वाहन चालकांना मागितला जाणार आहे. १ डिसेंबर ते ३१ मे दरम्यान २४ तास वाहन तपासणी मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ ), महामार्ग पोलिस, आयआरबी यांच्या संयुक्त विद्यमाने सहा महिने ही मोहीम चालणार आहे. सेव्ह लाइफ फाउंडेशन व ब्लुमबर्ग संस्थेने द्रुतगतीवर होणाऱ्या अपघातांचा अभ्यास केला. यात पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे.

कोणावर होणार कारवाई?
- वेगाने धावणाऱ्या, बेकायदेशीर पार्किंग, ब्रेकिंग सिस्टीम, लेन कटिंग करणारे, सीट बेल्ट न वापरणारे आदी वाहने.
- आरटीओचे पथक २४ तास महामार्गावर तसेच जुन्या मार्गावर गस्त घालणार.

द्रुतगतीवर का होतात अपघात?
- घाट उतरताना, ब्रेकमधील त्रुटी, सीटबेल्टचा वापर न करणे, चुकीच्या पद्धतीने लेनकटींग, वाहन बंद पडल्याने किंवा इतर कारणाने थांबलेल्या वाहनांमुळे आणि अतिवेगामुळे अपघात होतात.
- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अतिवेगामुळे, पादचारी, दुचाकीस्वार, हेल्मेटचा वापर न करणे.