MHADA
MHADA Tendernama
पुणे

दिवाळीत म्हाडाचा धमाका! 4 हजार घरांची बंपर लॉटरी

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : दिवाळीच्या मुर्हूतावर म्हाडाची (MHADA) मोठी लॉटरी निघणार आहे. म्हाडाच्या सदनिकांच्या संगणकीय लॉटरीसाठी ऑनलाइन नोंदणीचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात गुरुवारी (ता. २०) करण्यात येणार आहे.

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी ३ हजार ९३० घरांची सोडत काढण्यात येणार असून, या सोडतीसाठी अर्ज भरण्यास गुरुवारपासून सुरवात होणार आहे. म्हाडाने सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत १ हजार ४५० सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत. पुण्यासह म्हाळुंगे, पिंपरी वाघेरे, सोलापूर, ताथवडे या ठिकाणच्याही सदनिकांचा यात समावेश आहे.

म्हाडाच्या पुणे विभागाची या वर्षातील घरांची ही तिसरी सोडत आहे. आतापर्यंत २०१६ पासून ऑनलाइन पद्धतीने ३४ हजार ४९३ सदनिकांचे वितरण करण्यात आले आहे. कोरोनाकाळातही म्हाडाच्या पुणे विभागाने १५ हजार ४७७ घरांचे ऑनलाइन पद्धतीने सोडत काढून वितरण केले आहे. सोडतीसाठी गुरुवारी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्या दिवशी सकाळी दहानंतर ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात होईल. २१ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत २२ नोव्हेंबरपर्यंत आहे. नऊ डिसेंबरला सोडतीसाठी स्वीकृती अर्जाच्या प्रारुप यादी प्रसिद्ध होतील. त्यानंतर १२ डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध करून १५ डिसेंबरला म्हाडाच्या सभागृहात सकाळी दहा वाजता सोडत होणार आहे. त्यानंतर सोडतमधील यशस्वी, प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे म्हाडाच्या वेबसाईटवर त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध करण्यात येईल, असे म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी सांगितले.