Metro (File) Tendernama
पुणे

Good News: फुगेवाडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रवासाचा मुहूर्त ठरला?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) ते फुगेवाडी स्थानकादरम्यान (Fugewadi Station) सुरू असलेली मेट्रो (Metro) आता थेट शिवाजीनगर न्यायालय स्थानकापर्यंत (Shivajinagar Court Station) धावणार आहे. फुगेवाडी ते शिवाजीनगर मार्गिकेचे काम २५ दिवसांत पूर्ण होणार असून, १५ मे नंतर प्रवाशांसाठी ही सेवा सुरू होईल, अशी माहिती मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत सोनवणे यांनी सोमवारी (ता. १०) दिली.

फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय स्थानक हे अंतर आठ किलोमीटरचे तर पिंपरी ते शिवाजीनगर न्यायालय १३ किलोमीटर आहे. पिंपरी ते शिवाजीनगरसाठी २५ रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय मार्गावरील चाचणी ३१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आली होती. दर १५ मिनिटांनी प्रवाशांना मेट्रोतून जाता येणार आहे.

दैनंदिन पाच ते सहा हजार प्रवासी संख्या आहे. आता त्यात आणखी भर पडून ती दिवसाकाठी दीड ते दोन लाख होण्याची शक्यता आहे. या मार्गिकेवरील काम जवळपास संपुष्टात आले असून, उर्वरित कामे २५ दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर मार्गांचे सीएमआरएस निरीक्षण रेल्वे सुरक्षा आयुक्त करतील. त्यांच्या मान्यतेनंतर प्रवासी सेवा सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पिंपरी ते फुगेवाडी सर्व स्थानकांमध्ये मेट्रो थांबणार असून, फुगेवाडीच्या पुढे दापोडी, बोपोडी स्थानकात मेट्रो थांबा घेणार आहे. खडकी व रेंजहिल्स स्थानकांचे काम पूर्ण झाले नसल्याने बोपोडीवरून मेट्रो थेट शिवाजीनगर न्यायालय स्थानकात थांबणार आहे, असे सोनवणे यांनी सांगितले.