Omprakash Bakoria PMP
Omprakash Bakoria PMP Tendernama
पुणे

'या' कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; ओमप्रकाश बकोरियांची मोठी घोषणा...

टेंडरनामा ब्युरो

पुणे : PMPMLच्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या (PMC) धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची वाढीव वेतनाची ५० टक्के रक्कम जानेवारी महिन्यापासून दिली जाणार आहे. या निर्णयाचा सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. परंतु याबाबत मंगळवारी आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी जानेवारी महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. या मागणीबाबत बकोरिया यांनी सोमवारी बैठक घेतली. बैठकीत सातव्या वेतन आयोगाच्या फरकानुसारची ५० टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भानगिरे यांनी सांगितले. जानेवारी २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही महापालिका आयुक्तांची संयुक्त बैठक घेऊन सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर उर्वरित ५० टक्केवाढीनुसार वेतन देण्यास सुरवात केली जाणार आहे.

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे, यासाठी जागा निश्‍चित करावी. वैद्यकीय बिलांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, डेपोच्या परिसरात महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत, तसेच, कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन सुरू करण्यात यावे, अशी मागणी भानगिरे यांनी बैठकीत केली. त्यावर लवकर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन बकोरिया यांनी दिले.