PMP
PMP Tendernama
पुणे

बकोरियांचा चांगला निर्णय; बीआरटीतील पीएमपीच्या फेऱ्या वाढणार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पीएमपीने (PMP) ‘बीआरटी’मधून (BRT) धावणाऱ्या बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात बंद केलेल्या मार्गांवरील सुमारे १०० बस ‘बीआरटी’वरून धावणार आहेत. त्यामुळे दिवसभरात बीआरटीच्या एक हजार फेऱ्या वाढणार आहे. यातून सुमारे एक लाख प्रवाशांची वाहतूक होईल. परिणामी, ‘बीआरटी’मधून प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. जानेवारी २०२३ पासून बस (PMP Bus) व फेऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.

प्रवाशांचा प्रवास जलद होण्यासाठी शहरातील गर्दीच्या मार्गांवर ‘बीआरटी’ मार्ग सुरू केला आहे. आता शहराच्या सात मार्गांवर बीआरटी आहे. काही मार्गांवरील बीआरटी चांगल्या स्थितीत आहे तर काहींची दुरवस्था झाली आहे. असे असले तरीही बीआरटीमधून धावणाऱ्या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुणे व पिंपरी चिंचवडच्या बीआरटीमधून दररोज ६७४ बस धावतात. यातून रोज सुमारे सव्वाचार लाख प्रवाशांची वाहतूक होते. यात आता अधिकच्या १०० बसची भर पडणार असल्याने फेऱ्यांची संख्या देखील वाढणार आहे. परिणामी, प्रवाशांची संख्याही वाढण्यास मदत होणार आहे.

पुणे शहरात व बीआरटीमधून धावणाऱ्या बसेसच्या संख्येत पीएमपी वाढ करणार आहे. यात बीआरटीसाठी आणखी १०० बस जास्तीच्या धावणार आहेत. कात्रज ते स्वारगेट, निगडी ते दापोडी, येरवडा ते वाघोली, सांगवी फाटा ते किवळे या चार मार्गांवरील बीआरटीमधून पीएमपी बस धावणार आहेत.