पुणे (Pune) : शिरूर व दौंड तालुक्यातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी व दळणवळणाची सोय लक्षात घेऊन भीमा नदीवर वडगाव रासाई - नानगाव येथे नवीन पूल बांधण्यात आला. हा पूल झाल्याने दौंड व शिरूर तालुक्यातील अनेक गावे एकमेकांना जोडली गेली. परिसरातील कामगार वर्गाला, शाळकरी विद्यार्थ्यांना विविध कामासाठी कायम केडगाव तसेच पुण्याला जावे लागते. त्यामुळे अनेक प्रवासी याच पुलाचा वापर करत असतात.
सतत होणाऱ्या संततधार पावसामुळे वडगाव रासाई येथील भीमा नदीवरील पुलाच्या स्लॅबच्या लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत. यामुळे या ठिकाणी खड्डे पडू लागले आहेत. पुलावर अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागात मोठ्या प्रमाणावर ऊसशेती असल्याने पुलावरून उसाने भरलेले ट्रेलर, मोठी अवजड वाहतूक सतत होत असते. मागील तीन ते चार दिवसांपासून या भागात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर सळ्या उघड्या असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. साचलेल्या पाण्याचा अंदाज दुचाकीस्वारांना येत नाही. परिणामी, अपघाताची शक्यता वाढली आहे. यासह मोठ्या व अवजड वाहनांमुळे खड्ड्यांचे आकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पुलावरील उघड्या सळ्यांमध्ये वाहनांचे टायर अडकून या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची त्वरित दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार व नानगावचे माजी उपसरपंच विकास शेलार यांनी केली आहे.
एक वर्षापूर्वी केली होती पुलाची दुरुस्ती
एक वर्षापूर्वी या पुलाच्या लोखंडी सळया उघड्या पडल्या पडल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाने याची दुरुस्ती केली होती. परंतु सतत होणाऱ्या वाहतुकीमुळे या पुलावरील लोखंडी सळया पुन्हा उघड्या पडल्या आहेत. या पुलाची त्वरित दुरुस्ती व्हावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
वडगाव रासाई - नानगाव या पुलावरील लोखंडी सळ्या उघड्या झाल्या आहेत. सदर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित पुलाची दुरुस्ती करून घ्यावी.
- सचिन शेलार, सरपंच वडगाव रासाई
वडगाव रासाई - नानगाव पुलाची त्वरित पाहणी केली जाईल. सळया उघड्या पडल्याचे निदर्शनास आल्यास दुरुस्ती केली जाईल.
- रणजित धाईगडे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग शिरूर उपविभाग