मुंबई (Mumbai) : पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते.
या टप्प्यातील खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला व नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या प्रकल्पांचे महत्त्व लक्षात घेऊन या मेट्रो मार्गांना मान्यता देण्यात आली. या मार्गिंकांची एकूण लांबी ३१.६३ कि.मी. असून २८ उन्नत स्थानके आहेत. यासाठी ९ हजार ८१७ कोटी १९लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पाची महामेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास देखील मान्यता देण्यात आली.
राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित
पुणे जिल्ह्यातील मौ.जंक्शन, मौ.भरणेवाडी, मौ.अंथुर्णे, मौ.लासुर्णे येथील १३१ हेक्टर ५० आर. अशी राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मौ.जंक्शन येथील २० हेक्टर ३८ आर, मौ.भरणेवाडी येथील २४ हेक्टर २४ आर., मौ.अंथुर्णे येथील २१ हेक्टर १८ आर. आणि मौ.लासुर्णे येथील ६५ हेक्टी ७० आर. अशी ही जमीन चालू बाजारमूल्यानुसार देण्यात येईल.
पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी
ठाणे तालुक्यातील मौ.पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पाचपाखाडी येथील ५३४ सर्वे नंबर मधील ३६ गुंठे ९२ आर शासकीय जमीन ठाणे महापालिकेस प्रशासकीय भवनासाठी देण्यात येईल.