Chandrakant Patil Tendernama
पुणे

Pune: 'त्या' पुलासाठी सक्तीने भूसंपादन करा!

Chandrakant Patil यांनी पीएमसी आयुक्तांना दिले आदेश

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune): मुळा नदीवरील पुलाला जोडणाऱ्या रस्त्याची जागा मिळविण्यासाठी सक्तीने भूसंपादन करावे, असा आदेश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुणे महापालिकेला (PMC) दिला.

हा पूल बांधून अनेक वर्षे झाली, पण पुलाला जोडणाऱ्या रस्त्याची जागा महापालिकेला ताब्यात घेता आलेली नाही. त्यामुळे पाटील यांनी शुक्रवारी (ता. ४ ) थेट महापालिकेत येऊन आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी चर्चा केली. जर जागा मालक जागा ताब्यात देत नसतील, तर सक्तीचे भूसंपादन करा आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, असा आदेश त्यांनी दिला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०१३ मध्ये बालेवाडी आणि वाकड जोडण्यासाठी मुळा नदीवर पूल बांधण्यास संयुक्तपणे मंजुरी दिली होती. ३१ कोटी रुपये खर्च करून या पुलाचे काम २०१८-१९ मध्ये पूर्ण करण्यात आले. यास सहा वर्षे उलटूनही पूल वाहतुकीसाठी खुला झालेला नाही.

बालेवाडी येथील रस्त्याची जागा महापालिकेला ताब्यात घेण्यात अपयश आले आहे. जागा मालकांनी अनेकदा चर्चा करूनही तोडगा निघालेला नाही. बाणेर, वाकड, तसेच राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने हा पूल खुला होणे आवश्‍यक आहे, पण जागा मालक दाद देत नाहीत. त्यामुळे भूसंपादनासाठी पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेतली.

या पुलाला रस्ता जोडण्यासाठी १५ हजार चौरस मीटर जागेचे ११ जागा मालक आहेत. ते जागा देत नसतील तर सक्तीने भूसंपादनाची प्रकिया सुरू करा, कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून लवकर हा पूल खुला करा, असा आदेश त्यांनी दिला.