Traffic
Traffic  Tendernama
पुणे

चांदणी चौक : अभूतपूर्व वाहतूक कोंडीने वाहनचालकांना फूटला घाम

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौक (Chandani Chowk) येथील पूल पाडण्यासाठी सुरू असलेले पूर्वतयारीचे काम आणि सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने गुरुवारी सायंकाळनंतर चांदणी चौक परिसरात वाहतूक कोंडी झाली. मुंबईकडून येणारी व मुंबईला जाणाऱ्या दोन्ही मार्गावर रात्री उशिरापर्यंत वाहनचालक वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी वाकड, औंध, बाणेरमार्गे गणेशखिंड रस्त्याने वाहने वळविल्याने रात्री उशिरापर्यंत अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. एक ते दोन तास वाहतूक कोंडीत अडकल्याने वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले होते.

का मंदावली वाहतूक मंदावली?
वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने चांदणी चौक येथील एनडीए बावधन जुना पूल रविवारी पहाटे (ता. २) पाडण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग महामंडळ यांच्याकडून पुलाच्या ठिकाणी पूर्वतयारी केली जात आहे. हे काम वेगात सुरू असल्याने चांदणी चौकातून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक मंदावली होती. पुलाभोवतीचे दगड, माती बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. तसेच महामार्गावरील एका लेनवर बॅरिकेड्स टाकण्याचे काम सुरू झाल्याने वाहतूक आणखीच संथ झाली. त्यातच गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सेवा रस्त्यांवर पाणी आले. त्याचाही परिणाम वाहतुकीवर झाला. त्यामुळे चांदणी चौकातून कोथरूड, वारजे या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतूक कोंडी झाली. वारजे येथून चांदणी चौकाकडे जाणारी वाहने बालेवाडी ते चांदणी चौकापर्यंत अडकून पडली होती. ५ ते १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा असल्याने नागरिकांना १० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी दोन ते अडीच तास इतका वेळ लागत होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी त्याबाबत फोटो, व्हीडिओ समाज माध्यमांवर टाकत आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान, चांदणी चौक परिसरात वाहतूक संथ झाल्याने नागरिकांनी, पर्यायी मार्ग म्हणून वाकड, बालेवाडी येथून औंध व बाणेरमार्गे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकातून पुढे शिवाजीनगरला जाण्याचे निश्चित केले. मात्र बाणेर, औंध येथून ते विद्यापीठ मुख्य चौकापर्यंत एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. विद्यापीठ ते थेट औंध येथील ब्रेमेन चौकात वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये रुग्णवाहिकाही अडकली होती. दरम्यान, पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. रात्री १०.१५ नंतर वाहतूक कोंडी कमी झाली.

शिवाजीनगरपासून विद्यापीठापर्यंत वाहतूक कोंडी
शिवाजीनगरहून बाणेर, औंधला जाण्याऱ्या नागरिकांनी शिवाजीनगर ते विद्यापीठापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडीमध्ये अधिकच भर पडत गेली.

पुलाच्या पाडकामासाठी चांदणी चौक परिसरातील आणखी एक लेन कमी केली आहे. येथील मार्गावर सायंकाळी बॅरिकेड उभारल्याने रस्ता थोडा अरुंद झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक मंदावली होती. मात्र, कोंडी झाली नाही. आता वाहतूक सुरळीत आहे.
- राम राजमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन वाहतूक विभाग

मी पाच वाजता बालेवाडी येथून चांदणी चौकाकडे निघालो होतो. दहा किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांग होती. दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत अडकलो. चांदणी चौक ओलांडण्यासाठी मला रात्री सव्वाआठ वाजले.
- प्रा. उदय डोके, नागरिक