चाकण (Chakan): येथील नगर परिषदेच्या कार्यालयासमोर नगर परिषदेच्या ठेकेदारीच्या कामावरून ठेकेदारात वादविवाद झाले. त्यानंतर एकमेकांना हाताने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. शिवीगाळ तसेच एकमेकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. परस्परविरोधी फिर्याद आल्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.
हे गुन्हे अदखलपात्र आहेत, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण (ता. खेड) येथील नगर परिषदेच्या कार्यालयासमोर हा प्रकार बुधवारी (ता. १७) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. नगर परिषदेच्या ठेकेदारी कामाच्या टेंडरवरून एकमेकांत बाचाबाची, शिवीगाळ हाताने, लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली तसेच एकमेकांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
याप्रकरणी पोलिसात फिर्याद मंगेश अंबादास मुळे यांनी दिली आहे. यामध्ये आरोपी ओंकार विश्वास कौटकर, प्रज्योत विकास धाडगे, राहुल राजेंद्र शिर्के (सर्व रा. चाकण) यांची संशयित आरोपी म्हणून नावे दिलेली आहेत. ओंकार विश्वास कौटकर यांनी दिलेल्या फिर्यादीत आरोपी मंगेश अंबादास मुळे, चेतन संजय कौटकर यांची नावे आहेत.
चाकण नगर परिषदेच्या कार्यालयासमोर ठेकेदारी कामाच्या टेंडरच्या विषयावरून ठेकेदारात बाचाबाची शिवीगाळ, मारहाण, एकमेकांना जिवे मारण्याची धमकी असे प्रकार होतात. त्यामुळे या कामात आर्थिक मलिदा आहे का? टक्केवारीचा मोठा विषय आहे का? असे प्रश्न निर्माण होतात.
होणारी कामे खरोखर चांगल्या दर्जाची होतात का? हा प्रश्न चाकणकरांना पडतो आहे. होणाऱ्या कामात काही जण ठेकेदारांना सतावतात. त्यांच्याकडून टक्केवारी मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यातूनही कामाला विलंब लागतो, निकृष्ट दर्जाची कामे होतात, असे प्रकार सातत्याने घडत आहेत.
त्यामुळे चाकणमध्ये ठेकेदारी हा चर्चेचा विषय झाला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे चाकणकर नागरिकांचे तसेच पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.