Electricity
Electricity Tendernama
पुणे

'आकडे' बहाद्दरांविरोधात कारवाईसाठी महावितरणने उचलले मोठे पाऊल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक वीजगळती असलेल्या वाहिन्यांवरील गळतीचे प्रमाण कमी करण्याची मोहिम महावितरणने (MAHADISCOM) हाती घेतली आहे. १६ परिमंडलांतील २३० पेक्षा जास्त वाहिन्यांवर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत वीजचोरांविरुद्ध कारवाईबरोबरच नादुरुस्त मीटर बदलणे, एरियल बंच केबल्स टाकणे, मल्टीमीटर बॉक्स, कॅपॅसिटर बसविणे आणि वीजभाराचा समतोल राखणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारच्या अर्थसाहाय्याने महावितरणद्वारे राबविण्यात येणार असलेल्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये वीजहानी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने महावितरणने ही मोहिम हाती घेतली आहे. त्यासंदर्भात बोलाविलेल्या बैठकीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली.

वीजहानीची कारणे व त्यानुसार उपाययोजना राबविण्यासाठी वीज वाहिन्यांचे मीटरिंग सुस्थितीत आणणे, स्वयंचलित पद्धतीने घेण्यात आलेले रीडिंग अपलोड करणे, ग्राहकाला ज्या वितरण रोहित्रावरून वीजपुरवठा करण्यात येतो तेच रोहित्र बीलिंग प्रणालीमध्ये आहे किंवा नाही याची खातरजमा करणे आणि योग्य ऊर्जा अंकेक्षण करणे महत्त्वाचे आहे. विजेची चोरी, अयोग्य मीटरिंग, अनधिकृत वीजपुरवठा किंवा वीज वाहिन्यांवर असलेले आकडे, मीटर रीडिंगमधील त्रुटी, गुणक अवयव चुकीचे असणे आणि वीजबिलांमधील समस्या ही कारणे वाणिज्यिक हानी वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरांविरुद्ध धडक मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये नादुरुस्त मीटर तातडीने बदलण्यात येतील. तसेच मीटर रीडिंग अचूक राहील याची दक्षता घेण्यात येईल व वीजखांबावर मीटर बॉक्स बसविण्याचे कामही या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सिंघल यांनी सांगितले.