Bullet Train
Bullet Train Tendernama
पुणे

मोठी बातमी; केंद्राने Bullet Train प्रकल्पांचे काम थांबविले, कारण

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला (Mumbai - Ahmedabad Bullet Train Project) होत असलेल्या विलंबामुळे केंद्र सरकार ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे. मुंबई - पुणे - हैदराबादसह (Mumbai - Pune - Hyderabad) देशातील अन्य प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम थांबविले आहे.

एनएचआरसीएलने (नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन) मागच्या वर्षांपासून सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेला निधीही दिला नाही. परिणामी, ‘डीपीआर’चे कामही थांबले आहे. त्यामुळे मुंबई - पुणे - हैदराबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यांत आघाडी सरकार असताना पनवेलच्या भागात मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी आवश्यक जागेचे संपादन रखडले होते. त्याचा फार मोठा परिणाम मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामांवर झाला. आता मार्ग तयार करण्याचे काम जरी वेगाने सुरू असले तरीही हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

२०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर, प्रत्यक्षांत बुलेट ट्रेन धावू लागल्यानंतर त्याला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद पाहूनच मुंबई - हैदराबाद मार्गावरील बुलेट ट्रेनचे भवितव्य ठरणार आहे.

हे आहेत बुलेट ट्रेनचे प्रस्तावित मार्ग
दिल्ली - वाराणसी, दिल्ली - अमृतसर, दिल्ली- अहमदाबाद, अमृतसर - जम्मू काश्मीर, वाराणसी - हावडा, पाटणा - गुवाहाटी, मुंबई- अहमदाबाद, मुंबई - नागपूर, मुंबई - हैदराबाद, नागपूर- वाराणसी, चेन्नई - म्हैसूर, हैदराबाद - बंगळूर