पुणे (Pune) : बालेवाडीतील ज्युपिटर हॉस्पीटलकडून हायस्ट्रीटला जाण्यासाठीचा नवा रस्ता महापालिका सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी - PPP) विकसित करीत आहे. एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ३५ कोटी २७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या रस्त्याची सुमारे ७५ टक्के जागा ताब्यात आली आहे.
विकास आराखड्यातील रस्ते करण्यासाठी महापालिकेकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे काही कामे खासगी ठेकेदारांकडून ‘क्रेडिट नोट’वर करून घेतली जातात. त्यामुळे महापालिकेस थेट ठेकेदाराला पैसे द्यावे लागत नाहीत. त्याऐवजी मिळकतकर, बांधकाम विकास शुल्क आदींच्या माध्यमातून रक्कम वळती करून घेतली जाते.
कोथरूड, बाणेर, बालेवाडी, खराडी, महंमदवाडी या भागांतील काही रस्ते, उड्डाणपूल, नदीवरील पुलांचे काम सध्या अशा पद्धतीने सुरू आहेत.
हा रस्ता विकास आराखड्यात २४ मीटर रुंदीचा रस्ता दर्शविण्यात आला आहे. कस्पटे वस्तीला जोडणाऱ्या पुलापर्यंत सर्व्हे क्रमांक ५०, ५१, ४९, ४८, ४७, आणि ५० यामधून हा रस्ता जातो. सध्या ज्यूपीटरकडून हायस्ट्रीटला जाण्यासाठी वळसा घालून जावे लागते. नव्या रस्त्यामुळे या परिसरातील नागरिकांना फायदा होईल, अशी माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
महापालिकेने यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली होती. त्यात निखिल कन्स्ट्रक्शन्स या ठेकेदाराने पूर्वणगणपत्रकाच्या एक टक्का जादा दराने काम करण्याची तयारी दाखवली. हे टेंडर स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आले.
या कामासाठी २९ कोटी ३८ हजार ५१२ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. जीएसटी व अन्य शुल्कासह खर्च एकूण खर्च ३५ कोटी २७ लाख ५५ हजार ३८२ रुपये इतका होईल. या कामासाठी २४ महिन्यांची मुदत आहे.
विकास आराखड्यातील बालेवाडीतील २४ मीटर रुंदीचा रस्ता ‘पीपीपी’ तत्त्वावर केला जाणार आहे. सिमेंट काँक्रिटचा रस्ता करताना डांबरी रस्त्यापेक्षा जवळपास दुपटीने जास्त खर्च येतो. त्यामुळे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ३५ कोटी २७ लाख रुपये खर्च येत आहे. भूसंपादनाचा खर्च वेगळा आहे.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग