Chandani Chowk
Chandani Chowk Tendernama
पुणे

IMP: 'या' 2 दिवशी चांदणी चौकातून प्रवास करू नका; पहाटे 2 वाजता...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandni Chowk) जूना पूल रविवारी (ता. २) पहाटे दोन वाजेच्या सुमारास पाडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत मंगळवारी निश्चित झाले. त्यासाठी शनिवारी (ता. १) रात्री अकरा वाजेपासून रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येईल. तर त्यादिवशी पुलाच्या दोनशे मीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यात येणार आहे.

शनिवार ते रविवार सकाळी आठ या वेळेत चांदणी चौकातील वाहतूक बंद असेल. या कालवधीत साताऱ्याकडून येणारी आणि मुंबईकडे जाणारी, तसेच मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी वाहतूक मार्गांचे नियोजन केले गेले आहे. मुंबईवरून येणारी वाहतूक तळेगाव दाभाडे येथील टोलनाक्यापासून वळविण्यात येईल. तर साताऱ्यावरून येणारी वाहतूक खेडशिवापूर येथून वळविली जाईल. पूल पाडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील आठ दिवसांत सर्व्हिस रस्त्याचे डांबरीकरण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी या रस्त्यावरून शक्यतो नागरिकांनी प्रवास टाळावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प अधिकारी संजीव कदम, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहूल श्रीरामे, पूल पाडणाच्या कंपनीचे प्रतिनिधी उत्कर्ष मेहता यांची बैठक झाली. यात हा निर्णय झाल्याचे बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या बैठकीमध्ये प्रत्यक्ष पूल पाडण्याचे, पाडल्यानंतरच्या कार्यवाहीचे आणि वाहतुकीचे नियोजन करण्यात आले.

पूल पाडण्याचे काम नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या मुंबईच्या कंपनीला देण्यात आले आहे. याबाबत डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘पूल पाडण्यासाठी नियंत्रित स्फोट करण्यात येईल. त्यासाठी पूलाला छिद्रे पाडण्यात आली आहेत. शनिवार आणि रविवार वाहतूक कमी असल्यामुळे हा दिवस निश्‍चित केला असून पहाटे दोनच्या सुमारास हा पूल पाडण्यात येईल. या परिसराच्या दोनशे मीटर भागात येणाऱ्या तीन हॉटेलला नोटीस देऊन त्या दिवशी ते बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. दरम्यान पूल पाडण्याच्या दिवशी या मार्गावरील पर्यायी वाहतुकीचे नियोजन, तसेच राडारोडा उचलणे यांचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून रविवारी सकाळी आठ वाजेनंतर या रस्त्यावरील वाहतुक पुन्हा सुरळीत करण्यात येईल.’’

पूल पाडण्याचे असे आहे नियोजन
- शनिवारी (ता. १) रात्री अकरा वाजता मार्गावरील वाहतूक बंद
- मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पूल पाडण्यात येणार.
- पूलाला दीड मीटर खोल असे १ हजार ३०० होल (छिद्रे)
- त्यात सहाशे किलो स्फोटके, रिमोटच्या सहाय्याने स्फोट
- धूळ पसरू नये, यासाठी ७५०० चौ. मीटर इतके विशिष्ट प्रकारचे कापड
- स्फोटकांमुळे दगड उडू नये यासाठी ६५०० चौ. मीटर चेन लिंक बसविणार

राडारोडा उचलण्यासाठी यंत्रणा
स्फोटकाद्वारे पाच मिनिटांमध्ये हा पूल पाडण्यात येणार आहे. पाडल्यानंतर प्रत्यक्ष ठिकाणी काही जिवंत स्फोटके राहिले आहे कि नाही, यांची पाहणी होईल. अडीच वाजण्याच्या सुमारास राडारोडा उचलणे सुरू करण्यात येईल. त्यासाठी शंभर मजूर, आठ पॉकलेन, तीस टीपर तयार ठेवण्यात येतील. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपूर्ण राडारोडा उचलण्याचे नियोजन आहे. सकाळी आठनंतर पुन्हा या रस्त्यावरून वाहतूक सुरळीत करण्यात येईल.

पर्यायी मार्ग