PMPML
PMPML Tendernama
पुणे

Pune : PMPML प्रवाशांना नववर्षात बसणार फटका; तब्बल 490 बसचे आयुर्मान...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : नव्या वर्षात ‘पीएमपी’च्या ताफ्यातील सुमारे ४९० बसचे आयुर्मान संपणार असल्याने त्या प्रवासी सेवेतून बाद होतील. नवीन बस घेण्यासाठी ‘पीएमपी’ने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र त्या प्रत्यक्षात दाखल होण्यासाठी किमान ५ ते ६ महिन्यांचा अवधी लागू शकतो. नव्या बसमध्ये इलेक्ट्रिक बसचादेखील समावेश आहे. त्या मिळण्यास किमान वर्ष लागू शकते. शिवाय मागच्या मंडळाच्या बैठकीत २०० बस घेण्यास परवानगी मिळाली होती. त्यामुळे उर्वरित २९० बसचीदेखील कमतरता जाणवणार आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसणार हे निश्चित. शिवाय नवीन बस खरेदीचा विषय संवेदनशील बनल्याने ‘पीएमपी’चे अधिकारी यावर बोलण्यास तयार नाहीत.

‘पीएमपी’च्या ताफ्यात एकूण सुमारे २०७९ बस आहेत. यात ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या ९८१, तर १०९८ ठेकेदारांच्या आहेत. मात्र प्रत्यक्षात १६५० बस रस्त्यावर धावतात. यातील ४९० बसचे आयुर्मान जून २०२४ मध्ये संपणार आहेत. यात ठेकेदारांच्या व ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या बसचा समावेश आहे. बसची कमतरता लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने यापूर्वीच बसचे आयुर्मान १० वर्षांहून वाढवून १२ वर्षे केले. वाढविलेल्या आयुर्मानाची मुदतदेखील जूनला संपणार आहे. १६५० पैकी ४९० बस प्रवासी सेवेत धावणार नसल्याने जवळपास ३० टक्के बसची संख्या कमी होईल, निश्चितच याचा परिणाम प्रवासी सेवेवर होणार आहे.

संख्या वाढविण्याची गरज

पीएमपी प्रशासनाने मागच्या वेळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत २०० बस खरेदीचा निर्णय घेतला होता. ४९० पैकी २०० बसची खरेदी झाली तरीही २९० बसची कमतरता जाणवेल. याचा फटका नियमित प्रवास करणाऱ्या किमान ८५ हजार प्रवाशांना बसणार आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने बसची संख्या वाढविणे गरजेचे आहे.