5G Spectrum
5G Spectrum Tendernama
पुणे

मोबाईल नेटवर्कला तुम्ही वैतागला आहात का? मग ही बातमी वाचा...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणेकरांसाठी एक गुड न्यूज आहे. (Good News For Punekars) ४-जी नेटवर्कमुळे वैतागलेल्या मोबाईल वापरकर्त्यांना लवकरच ५-जी मोबाईल नेटवर्क वापरण्यास मिळणार आहे. त्यासाठी तातडीने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना राज्य सरकारने पुणे महानगर पालिकेला दिले आहेत. ५ जी सेवा पहिल्या टप्प्यात देशातील १३ शहरांमध्ये सुरू होणार असून, यात पुण्याचा समावेश आहे. (5G Network In Pune)

देशातील सर्व आघाडीच्या कंपन्यांनी सहभाग घेतल्याने आता ५जी सेवा ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. केंद्र सरकारने नुकतीच ५जी सेवेसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव केला, त्यातून तब्बल दीड लाख कोटींचा महसूल मिळाला आहे.

मुंबईत एक बैठक झाली, त्यामध्ये ५जी सेवेबद्दल आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या दोन शहरांचाच पहिल्या टप्प्यात समावेश आहे. त्यासाठी महापालिकेने कंपन्यांना टॉवर्स, डक्ट्स आणि ट्रान्समीटर बसविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, त्यासाठीच्या परवानग्या लवकर द्याव्यात, अशा सूचना दिलेल्या आहेत.

सध्या राज्यात प्रत्येक शहरात सेवा वाहिन्या टाकण्यासाठी भिन्न स्वरूपाचे शुल्क आहेत. पुण्यात प्रति मीटर १२ हजार रुपये शुल्क आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत खोदाई शुल्क व अन्य शुल्क एकच असणार आहे, हे शुल्क राज्य शासनच निश्चित करणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.
५जी ही मोबाईल नेटवर्कची ५वी जनरेशन असून नेटवर्क स्पीड, कोणत्याही अडचणीशिवाय एचडी सर्फिंग, सर्वोत्तम सेवा असणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांसह इंटरनेट व त्याच्याशी संबंधित सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल होतील.

४जीचा इंटरनेट स्पीड १ जीबीपीएसपर्यंत आहे. ५जी आल्यानंतर हा स्पीड २० जीबीपीएसपर्यंत जाणार आहे. तंत्रज्ञान हेल्थकेअर, व्हर्च्युअल रिअॅलिटी, क्लाऊड गेमिंग यासाठी नवीन मार्ग खुले होणार आहेत. तसेच कृषी, शिक्षण, आरोग्य, परिवहन, दळणवळण यासाठीही फायदा होणार आहे.
दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, देशभरात १३ शहरांत सर्वांत आधी ५जी सेवा उपलब्ध होणार आहे. यामध्ये पुण्यासह मुंबई, अहमदाबाद, बंगळूर, चंडीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकता, लखनौ या शहरांचा समावेश आहे.