पुणे (Pune) : पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न जटिल बनला आहे. त्यावर मार्ग काढावा लागेल. त्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांच्याशी मी चर्चा केली आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रश्न नितीन गडकरी यांना भेटून सोडवू, तर राज्य सरकारचे प्रश्न आम्ही एकत्र बसून सोडवू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पवार यांनी स्पष्ट केले.
आम्ही पुण्यात पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप होऊ देत नाही. त्यांना आवश्यक सर्व पायाभूत सोई-सुविधांसह काम करण्याची मुभा दिली आहे. तरीही शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. याचाच अर्थ वरिष्ठ पोलिस अधिकारी कमी पडत आहेत. कायदा सुव्यवस्था राखणे आवाक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगावे, नव्या पोलिस अधिकाऱ्यांना आणून गुन्हेगारीला चाप लावू, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांना सज्जड दम भरला.
पवार यांनी गुरुवारी पुण्यात विविध विकासकामांबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पिंपरी-चिंचवडप्रमाणे करप्रणालीसाठी सूचना
पिंपरी-चिंचवड महापालिकेने कर प्रणालीमध्ये चांगल्या सुधारणा केल्या आहेत. विशेषतः ड्रोन पद्धतीने मालमत्ता सर्वेक्षण करून त्यांनी नवीन सव्वातीन लाख मालमत्ता शोधल्या आहेत. मालमत्तांमुळे त्यांना २०२४-२५ वर्षात एक हजार ३५० कोटी रुपये कर गोळा होऊ शकतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर पुणे महापालिकेनेही या सुधारणांचे अनुकरण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना दिल्या आहेत. पीएमपीसाठी दोनशे नवीन टाटा बस घेण्याचा निर्णय घेतल्याचेही पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले...
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी संबंधितांना आश्वासन
- रिंगरोडबाबतचे प्रश्न सोडविण्याबाबत बैठकीत चर्चा
- त्रुटींमुळे शिक्षकांना पगार मिळण्यास विलंब, शिक्षण आयुक्तांना चौकशीचे आदेश देणार
- सुनील तटकरे यांनी पक्ष प्रवेशाबाबत कोणत्याही खासदाराला फोन केलेले नाहीत