Pune
Pune Tendernama
पुणे

Ajit Pawar : शिंदे - फडणवीस - पवार बारामतीत एकत्र येणार? अजितदादांचा काय आहे प्लॅन?

टेंडरनामा ब्युरो

बारामती (Baramati) : आगामी महिन्यात बारामतीतील अत्याधुनिक बसस्थानक, ब-हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालय व पोलिस गृहनिर्माण वसाहत या तीन भव्य वास्तूंचे उदघाटन करण्यात येईल, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

बारामतीत जवळपास 50 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक व सुसज्ज बसस्थानक अजित पवार यांच्या पुढाकारातून उभारण्यात आले आहे. एखाद्या विमानतळाच्या धर्तीवर हे बसस्थानक असून यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. पुणे पोलिस मुख्यालयावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने बारामतीनजिक ब-हाणपूर येथे पोलिस उपमुख्यालय वसविण्यात आले आहे. अत्यंत आधुनिक इमारती, प्रशिक्षण केंद्र, परेड ग्राऊंड व निवासस्थाने उभारण्यात आली आहेत.

बारामती शहर, तालुका व वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी तब्बल 196 निवासस्थाने असलेल्या सात अत्याधुनिक इमारती पोलिस लाईनच्या परिसरात उभारण्यात आलेल्या आहेत.

या तिन्ही इमारती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे. पाहणी दौ-याच्या वेळेस पवार यांनी याबाबत सूतोवाच केले असून, प्रशासन आता त्या दृष्टीने तयारीला लागले आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हे उदघाटन घ्यायचे असल्याने या आठवड्यात याच्या तारखा निश्चित होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.