Ajit Pawar Tendernama
पुणे

AIIMS: पुण्यात एम्सच्या स्थापनेबाबत काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?

Ajit Pawar: पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय ठेऊन प्रयत्न करण्याचे निर्देश

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मराठवाड्याच्या सामाजिक, आर्थिक विकासाला गती देण्यासाठी बीड ते परळी रेल्वेमार्ग लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर परळी ते थेट अहिल्यानगरपर्यंत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या मार्गासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वे आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारशी समन्वय ठेऊन प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

पुणे मेट्रो लाईन-3 शिवाजी नगर ते हिंजवडी या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे. प्रकल्पाचे काम दर्जेदार झाले पाहिजे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने मेट्रोच्या प्रकल्पांचे काम करीत असताना पुलांखाली वाहतूक कोंडी होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. कर्जत-भिमाशंकर-खेड-शिरुर हा नवीन महामार्ग करण्यासंदर्भात त्यांनी आढावा घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी वढू व तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पुणे येथील वीर वस्ताद लहूजी साळवे स्मारक, लोणावळा येथील नियोजित स्काय वॉक, टायगर पॉईंट, ‘सारथी’ संस्थेच्या नाशिक, कोल्हापूर, नागपूर, खारघर, संभाजीनगर, अमरावतीच्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, सातारा सैनिक स्कूल, वडाळा येथील जीएसटी भवन, रेडिओ क्लब मुंबई, रत्नागिरीचे मिरकरवाडा बंदर, कृषी भवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, पुरंदर विमानतळ, ऑलंम्पिक भवन व संग्रहालय, पुणे, परळी आणि बारामती शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात, ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’ची बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैसवाल, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, राज्यकर आयुक्त आशिष शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी उपस्थित होते.