Chakan Traffic Tendernama
पुणे

मंत्र्यांची कोटीच्या कोटींची उड्डाणे; तरीही वाहतूक कोंडीचा फास सुटेना

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. परिणामी औद्योगीक उत्पादनावर आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे.

वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, कर्मचारी आणि उद्योजक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, केंद्र आणि राज्य शासनाच्या उदासीन धोरणांमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांकडून केवळ महामार्गासाठी केलेल्या तरतुदीचे कोटीच्या कोटींचे आकडे जाहीर केले जात आहेत. पण, प्रत्यक्षात मात्र महामार्गाच्या कामाला सुरवात होत नसल्याचे दिसून येते.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तळेगाव, चाकण, रांजणगाव, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज या ठिकाणी एमआयडीसी क्षेत्र विकसित झाले आहे. या एमआयडीसीमधील कंपन्यांना कच्चा माल आणि कंपन्यांत तयार होणारा पक्क्या मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर रस्ते मार्गाने होते. तसेच विदेशात निर्यात होणारा माल मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन होतो. यासाठी शिक्रापूर-चाकण-तळेगाव मार्गाचा वापर होतो. तसेच नाशिकला जाणारी वाहने देखील शिक्रापूर-चाकण मार्गाचा वापर करतात.

राज्यातील सर्वात व्यस्त महामार्गापैकी एक महामार्ग म्हणून शिक्रापूर-तळेगाव मार्गाचा समावेश होतो. या महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे. परिणामी या महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गडद होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. दररोज या महामार्गावर छोटे-मोठे अपघात होत आहेत. यात जीवितहानी आणि गंभीर जखमी होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर आहे.

रस्त्याची चाळण..
चाकण-तळेगाव महामार्गावर पावसामुळे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या महामार्गाची अक्षरक्षः चाळण झाली आहे. परिणामी या महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरु असते. मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यावर रस्त्यांवरील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघात होत आहेत. तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) एमडी इन्फ्रा कंपनीला दिले आहे. पण, या कंपनीकडून देखभाल दुरुस्तीचे कामे होताना दिसून येत नाही. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अशी आहेत कारणे
- एचपी चौकातील सिग्नल यंत्रणा बंद
-चाकण चौकातील सिग्नल यंत्रणेचा टायमिंग कमी असल्याने वाहतूक कोंडीत भर
- महामार्गावरील अरुंद रस्ते
- महामार्गावरील अतिक्रमण काढले. पण, त्याठिकाणी डांबरीकरण नाही
- महामार्गाच्या दोन्ही बाजूला अवजड वाहनांची पार्किंग आणि कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या वाहनांची पार्किंग
- अवजड वाहन रस्त्यातच बंद पडल्यास वाहतूक कोंडी
- सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहने आणि कंपन्यांच्या बस एकाच वेळी महामार्गावर
- वाहतूक पोलिस अवजड वाहनांवर कारवाई करण्यातच व्यस्त
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेचे दुर्लक्ष

अशा आहेत उपाययोजना
- तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग रुंदीकरण
- महामार्गावरील अतिक्रमणे काढणे
- चाकण चौकात उड्डाणपूल
- तळेगाव-चाकण आणि चाकण-शिक्रापूर महामार्गाला पर्यायी रस्ता
- रस्त्याच्या दुतर्फा असलेली वाहनांची पार्किंग काढणे
- चौकातील रिक्षा स्टॅण्ड काढणे