PMC
PMC Tendernama
पुणे

केंद्राच्या 'या' निर्णयाने पुणे मनपाला 450 कोटींचा फटका; पुन्हा...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : केंद्र सरकारने (Central Government) मैलाशुद्धीकरण प्रकल्पातील सीओडी आणि बिओडीचे निकष बदलल्याने सहा मैलाशुद्धीकरण प्रकल्प अवघ्या २० वर्षात पाडून टाकण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. हे सहा मैलाशुद्धीकरण प्रकल्प पुन्हा बांधण्यासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्याबाबत सल्लागाराने अंतिम अहवाल अद्याप महापालिकेला दिला नाही, पण त्याबाबत प्राथमिक माहिती दिली आहे.

मुळा मुठा नदीमध्ये रोज ९९० एमएलडी मैलापाणी येत आहे, त्यापैकी सुमारे ५५० एमएलडी पाण्यावर सध्या प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडले जाते. तर उर्वरित ३९६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मुळामुठा नदी सुधार प्रकल्पाचे (जायका) काम सध्या सुरू आहे.

पुणे महापालिकेने २००८ पूर्वी शहरात १० मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारले. त्यापैकी नायडू रुग्णालय येथील प्रकल्प पाडला आहे. सध्या ९ प्रकल्पांद्वारे नदीत येणारे मैलापाणी शुद्ध केले जात आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी ‘सीओडी’ आणि ‘बीओडी’चे निकष बदलले आहेत. या नव्या निकषानुसार महापालिकेच्या ‘एसटीपी’मधील सध्याचे तंत्रज्ञान कालबाह्य झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला आहे. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही, पण सहा मैलाशुद्धीकरण प्रकल्प पाडावे लागतील असे सांगण्यात आले आहे.

सीओडी, बीओडी म्हणजे काय?

अशुद्ध पाण्यातील रासायनिक पदार्थांचे विघटन करण्यासाठी किती ऑक्सिजनची गरज आहे, यावरून केमिकल ऑक्सिजन डिमांडचे (सीओडी) प्रमाण मोजले जाते. पाण्यातील रासायनिक पदार्थ प्रदूषणाचा मापदंड म्हणून सोओडीचा वापर केला जातो. तर अशुद्ध पाण्यातील जैविक पदार्थांचे विघटन करण्यासाठी सूक्ष्म जंतूंना ऑक्सिजनची किती गरज आहे यावरून (बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडचे - बीओडी) प्रमाण मोजले जाते. जेवढे बोओडीचे प्रमाण कमी तेवढे पाणी शुद्ध असते.

केंद्रीय राज्य प्रदूषण महामंडळाने मैलाशुद्धीकरण केंद्राचे निकष बदलले आहेत. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी व बीओडीचे प्रमाण १० मिली ग्रॅम आणि सीओडीचे प्रमाण ५० मिली ग्रॅमपर्यंत आणण्यासाठी एसबीआर नावाचे तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्‍यक आहे. सल्लागाराचा अंतिम अहवाल मिळाला नाही, पण सहा केंद्र पाडावे लागणार आहेत.

- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

हे प्रकल्प पडणार

एरंडवणे, विठ्ठलवाडी, नायडू रुग्णालय, भैरोबानाला, बोपोडी आणि नरवीर तानाजीवाडी. तर बाणेर, खराडी, मुंढवा हे प्रकल्प पाडण्याची गरज नाही. त्यात सुधारणा करणे शक्य आहे.

सद्यःस्थितीतील मैलाशुद्धीकरण प्रकल्प व क्षमता

भैरोबा - १३० एमएलडी

एरंडवणे - ५० एमएलडी

तानाजीवाडी - १७ एमएलडी

बोपोडी - १८ एमएलडी

मुंढवा - ४५ एमएलडी

विठ्ठलवाडी - ३२ एमएलडी

नायडू नवीन - ११५ एमएलडी

बाणेर - ३० एमएलडी

खराडी - ४० एमएलडी

नायडू (बंद) - ९० एमएलडी