Gulabrao Patil
Gulabrao Patil Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Nagar : देवठाण पाणी योजनेसाठी महिन्यात कार्यादेश : गुलाबराव पाटील

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील देवठाण येथील तीन गावांसाठी असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित प्रस्तावाची टेंडर प्रक्रिया सुरू असून महिनाभरात कार्यादेश देण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य प्रा. राम शिंदे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. देवठाण पाणी पुरवठा योजनेच्या सध्यस्थितीबाबत अधिक माहिती देताना मंत्री श्री.पाटील म्हणाले, ही योजना जिल्हा परिषदेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आली आहे. याअंतर्गत समाविष्ट गावे व वाड्यांसाठी सर्वेक्षण करून 24.93 कोटी रूपयांची मूळ योजना तयार करण्यात आली होती.

यापूर्वीचे योजनेचे सर्वेक्षण योग्य असून ग्रामस्थांनी वाढीव टाक्या, वितरण व्यवस्था व दूरच्या चार वाड्यांपर्यंत पाईपलाईनची मागणी केली आहे. पुनर्सर्वेक्षण करून सुधारित प्रस्तावात या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. सुधारित अंदाजपत्रक अंतिम करण्याची कार्यवाही प्रगतीत असून टेंडर प्रक्रिया सुरू आहे. येत्या महिनाभरात याबाबतचे कार्यादेश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. याकामाच्या सर्वेक्षणामध्ये त्रुटी आढळल्यास त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले. पुरेशा पाण्याच्या उद्भवाशिवाय पाणी योजनांची पुढील कामे होऊ नयेत, याबाबतची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सदस्य एकनाथ खडसे यांनी याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.