सोलापूर (Solapur): उजनी परिसरात जल पर्यटन करण्यासाठी ५२० कोटींचा प्रकल्प राबविला जात आहे. या कामासाठी टेंडर (Tender) काढण्यात आली होती. आमच्या जागेवर आम्हीच पर्यटन विकास करणार, अशी भूमिका जलसंपदा विभागाने घेतली आहे.
पर्यटन आणि जलसंपदा हे दोन्ही विभाग शासनाचेच आहेत. मग पर्यटन विकास आम्हीच करणार, असा जलसंपदा विभागाचा हट्ट कशासाठी?, पर्यटन विभागावर जलसंपदा विभागाचा विश्वास नाही का? असा सवाल माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पंढरपूर, अक्कलकोट यामुळे सोलापूर जिल्ह्याचे नाव आध्यात्मिक पर्यटनात दिवसेंदिवस मोठे होत आहेत. याला उजनीच्या जल पर्यटनाची जोड मिळाल्यास नवीन रोजगार निर्मिती होईल, त्यामुळे मंजूर असलेला उजनी जल पर्यटन प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा, यासाठी माझा अधिवेशनात व सरकारकडे पाठपुरावा राहील, अशी माहितीही आमदार पाटील यांनी दिली.
माढा मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी जवळपास ८६ हून अधिक पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांना दिले आहेत. मे २०२३ मध्ये झालेल्या अवकाळीमध्ये जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याचे पैसे तत्काळ मिळावेत, यासाठी अधिवेशनात व कृषी मंत्र्याकडे पाठपुरावा केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जात आहे. या महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्व नेत्यांनी एकत्रित यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पंढरपूर कॉरिडॉरच्या बाबतीतही आमची हीच भूमिका आहे. कॉरिडॉरला विरोध करणाऱ्यांना प्रशासनाने विश्वासात घेऊन काम करावे. लोकांना उद्ध्वस्त करून विकास करू नये, लोकांना बाजारभावापेक्षा जास्त मोबदला मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पंढरपूर तालुक्यातील आगामी निवडणुका आम्ही विठ्ठल परिवार म्हणून लढणार आहोत. आता होणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. या निवडणुकीत विठ्ठल परिवारातील सर्वांनी एकत्र राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नव्या कार्यालयांसाठी प्रयत्न
पंढरपुरात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावे, मोडनिंब (ता. माढा) येथे नवीन पोलिस ठाणे व नगरपंचायत व्हावी, करकंब (ता. माढा) येथे नगरपंचायत, अपर तहसील कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालय व्हावे, टेंभुर्णी येथे नगरपंचायत व्हावी, यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. या शिवाय माढा तालुक्यात नवीन पोलिस उपविभागीय कार्यालयांचीही निर्मिती व्हावी यासाठी संबंधित मंत्री व सचिवांकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.