Tender Scam Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Tender Scam : टेंडरचे बिल मंजूर करण्यासाठी घेतली 40 हजारांची लाच; सहायक आयुक्तच जाळ्यात

टेंडरनामा ब्युरो

सांगली (Sangali) : बचतगटाने घेतलेल्या टेंडरचे बिल मंजूर केल्याबद्दल पाच टक्के प्रमाणे ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केलेल्या समाज कल्याणच्या सहायक आयुक्तास एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली.

नितीन उषा संपत-उबाळे (वय ४६, खरे क्लब हाऊसजवळ, विश्रामबाग, सांगली. मूळ साखरवाडी, ता. फलटण) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याच्या घरावर छापेमारी करण्यात आली असून, काही महत्त्‍वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.

याबाबत लाचलुचपत विभागाकडून सांगण्यात आले की, तक्रारदारांचा बचतगट आहे. बचतगटाने समाज कल्याण विभागाकडील जेवण पुरविण्याचे कंत्राट घेतले होते. तक्रारदारांच्या बचतगटाचे ८ लाख १२ हजार रुपये बिल मंजूर केल्याबद्दल दहा टक्‍क्‍यांप्रमाणे उबाळेने लाचेची मागणी केली. तडजोड करून पाच टक्‍क्‍यांप्रमाणे ४० हजार रुपयांची मागणी केली.

लाचलुचपत विभागाच्या पडताळणीत स्पष्ट झाल्यानंतर उबाळेने लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक आयुक्त उबाळे याच्या कक्षाजवळ सापळा रचला. तक्रारदाराकडून ४० हजार रुपये लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.

लाचखोर उबाळेविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार सायंकाळी उशिराने गुन्हा दाखल झाला. उबाळेला सांगलीतील न्यायालयासमोर हजर केले तेव्हा एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली, अशी माहिती उपअधीक्षक उमेश पाटील यांनी दिली.