Solapur
Solapur Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : ‘अमृत स्टेशन’च्या कामासाठी अडथळे; मनपा परिवहन, ‘एनआरएमयू’कडून प्रतिसादाची अपेक्षा

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी अमृत स्टेशन योजना कार्यान्वित केली आहे. सोलापूर रेल्वे स्थानकाचा या योजनेत समावेश झाला आहे. या योजनेतील कामांना सुरुवात झाली आहे. सोलापूर रेल्वे स्थानकाच्या विस्तारिकरणासाठी पाच प्रमुख वास्तूंचा अडथळा ठरत होता. त्यापैकी तीन वास्तूंचे अडथळे दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला यश मिळाले आहे. आणखी दोन अडथळे दूर होत नसल्याने अमृत स्टेशनच्या गतीवर परिणाम होऊ लागला आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील १५ रेल्वे स्थानकांचा अमृत स्टेशनमधून विकास होणार आहे. त्यामध्ये सोलापूर रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. त्यासाठी जवळपास ५५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावर आता होणारी प्रवाशांची गर्दी, भविष्यातील गर्दीचे नियंत्रण याचा विचार करुन विस्तारिकरण केले जात आहे. विस्तारिकरणाच्या या कामासाठी शहर पोलिसांची चौकी, रेल्वेच्या विशेष बलचे कार्यालय, टेक्निकल इन्स्टिट्युट, महापालिका परिवहन विभागाचा बस थांबा व नॅशनल रेल्वे मजदुर युनियनच्या (एनआरएमयु) सोलापूर विभागाचे कार्यालय हे पाच अडथळे दूर करणे आवश्‍यक आहे. या पाच पैकी तीन अडथळे दूर करण्यात आले आहेत. बस थांबा आणि एनआरएमयु हे दोन अडथळे अद्यापही दूर झालेले नाहीत.

बस थांबा हटविण्यासाठी रेल्वेच्यावतीने महापालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. युनियनचे कार्यालय हटविण्यासाठी युनियनला पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव रेल्वेने युनियनकडे दिला असल्याचे समजते. या दोन्ही अडथळ्यांसाठी समोरून सकारात्मक प्रतिसाद येत नसल्याने मोदींच्या संकल्पनेतील अमृत स्टेशन योजनेची गती कमी झाली आहे. हे दोन अडथळे दूर झाल्यानंतर अमृत स्टेशन योजनेतील कामांना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षपणे सुरवात होणार आहे.