सोलापूर (Solapur): सोलापूर महापालिकेतील रणजीत टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वाहनांच्या टेंडरमध्ये वाढीव दराने बिले अदा केल्याच्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. असे असतानाच याच मक्तेदाराला यापूर्वी मंजूर असलेल्या दराने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. नगरअभियंता नीलकंठ मठपती यांनी ही मुदतवाढ दिल्याने महापालिका प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजासाठी गरजेनुसार वाहने आणि मशिनरी भाडेतत्त्वावर घेतल्या जातात. रणजीत टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या मक्तेदाराला पोकलेन पुरवठ्यासाठी यापूर्वी मंजूर दराने मुदतवाढ देण्यात आली आहे.
वाढीव दराने बिले अदा केल्याचा आरोप
नालासफाईच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या मशिनरीचे दर अधिक असल्याचा आरोप झाला होता. वाढीव दराने बिले अदा करून मक्तेदाराला फायदा करून दिल्याचाही आरोप करण्यात आला. याबाबत नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिका सभागृहात लक्षवेधी मांडली होती.
महापालिकेच्या नियुक्त वार्षिक मक्तेदारांना देण्यात येणाऱ्या दरांच्या तुलनेत रणजीत टूर्स अँड ट्रॅव्हल्सला दुप्पट दर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी झाल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत नगरअभियंता सारिका आकुलवार यांच्यासह १७ जणांवर ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर ज्या टेंडरमधील दर आणि बिलांबाबत तक्रारी झाल्या आहेत, त्याच मक्तेदाराला पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याने प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
चौकशी एका बाजूला, मुदतवाढ दुसऱ्या बाजूला
ज्या टेंडरची वैधता, प्रक्रिया आणि त्यातील निर्णयांची चौकशी सुरू आहे, त्याच टेंडरमधील मक्तेदाराला चौकशी पूर्ण होण्यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच मुदतवाढ देण्याची गरज का निर्माण झाली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चौकशीचा निष्कर्ष येईपर्यंत संबंधित टेंडरमधील निर्णयांपासून प्रशासनाने अलिप्त राहणे अपेक्षित असताना मुदतवाढ देण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरणाची मागणी होत आहे.
नवीन टेंडर प्रक्रिया सुरू होणार
याबाबत नगरअभियंता नीलकंठ मठपती यांनी नवीन टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. या कालावधीत कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून मुदतवाढ देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, या मक्तेदाराकडून कोणत्याही प्रकारची नालेसफाई किंवा इतर कामे करून घेतली जाणार नसल्याचे मठपती यांनी सांगितले.
Key Points
रणजीत टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या टेंडरला पुन्हा मुदतवाढ
वाढीव दराने बिले अदा केल्याची तक्रार आणि अनियमिततेचे आरोप
चौकशीत नगरअभियंता सारिका आकुलवार यांच्यासह १७ जणांवर ठपका
संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू
पोकलेन पुरवठ्यासाठी यापूर्वी मंजूर दराने मुदतवाढ
नवीन टेंडर प्रक्रियेला दोन ते तीन महिने लागणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे
गैरसोय टाळण्यासाठी मुदतवाढ दिल्याचे नगरअभियंता नीलकंठ मठपती यांचे स्पष्टीकरण